सातारा - एका विचारांचं स्थिर सरकार आपण या महाराष्ट्राला दिलं आहे. राष्ट्रवादीवाले भर पावसामध्ये सभा घेत आहेत पण गावांमध्ये ठणठणाट होता, तेव्हा जर तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आलीच नसती अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीशरद पवारांवर केली आहे.
माण येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत पणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा. समाजा समाजामध्ये भिंती उभ्या करायच्या. असे का करायचे? शिवरायांनी या भिंती तोडून मोडून टाकल्या होत्या आणि समाजाला एका पवित्र भगव्या झेंड्याखाली एकवटले होते. बारा मावळ एकवटल्यानंतर जी ताकद उभी राहिली ती महाराष्ट्र नाही देश नाही तर पूर्ण जगाचे डोळे दिपवणारी होती असं त्यांनी सांगितले.
तसेच ४५० वर्षांनंतरसुद्धा हा देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलो की अंगावर रोमांच उभे राहतात. मराठा समाजाचा मागे जशी शिवसेना उभी राहिली तशी धनगर समाजाच्या मागे माळी समाजाच्या मागेसुद्धा शिवसेना उभी आहे. शिवसेनाप्रमुखांनी एक शिकवण दिली आहे प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. प्रत्येक उपाशी पोट हे भरले गेले पाहिजे ही शिवरायांची शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला वारंवार दिली असं सांगत उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका केली.
दरम्यान, पाणी हे काय समाज बघून देतात का? जे पाणी युती सरकार देईल हे माझ्या प्रत्येक बांधवांच्या घरामध्ये जाईल तेव्हा कोणताही समाज बघितला जाणार नाही. हे माझे वचन आहे. १० रुपयांमध्ये मी माझ्या गरीब जनतेला जेवण देणार म्हणजे देणारच. १ रुपयांमध्ये प्राथमिक आरोग्य चाचणी करणार म्हणजे करणारच. मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणजे करणारच. हा दुष्काळी भाग आहे पण मला माहिती आहे तुम्ही लढवय्या आहात असं सांगत शिवसेनेला मतदान करावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी या सभेत केलं.