सातारा : मागील दोन दिवसापासून पुन्हा हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाचा फटका आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला बसला आहे. कोरोना महामारीमुळे प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर सुरु झालेल्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवकाळी पावसामुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये या स्पर्धा मागील दोन दिवसापासून सुरु होत्या.वादळी पावसामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढील सूचना मिळे पर्यंत स्थगित करण्यात आल्या. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी माहिती दिली. मागील दोन दिवसापासून छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये मोठ्या थाटामाटात कुस्तीचा फड रंगला होता. मात्र पावसामुळे कुस्ती पैलवानाबरोबरच कुस्ती शौकीनांचा हिरमोड झाला. या स्पर्धेत माती गटातील कुस्ती स्पर्धेत अनेक दिग्गज पैलवानांना पराभवाचा धक्का बसला आहे.हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर काही भागात गारपीट देखील झाली. या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्याला या पावसामुळे मोठा फटका बसला. याचबरोबर आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेलाही या पावसाचा फटका बसला आहे.
Maharashtra Kesari Wrestling Tournament: पावसामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 5:17 PM