- प्रमोद सुकरे कराड - सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. सातारा जिल्हाही त्याला अपवाद नाही. सातारा जिल्हा तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली असली, पुतण्यासह राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह महायुतीच्या सोबत असले तरी थोरल्या पवारांच्या जिल्ह्यातील प्रभावाची धास्ती मात्र आजही महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याचे प्रत्यंतर मंगळवारी कराडात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यातही दिसून आले.
एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता .पण सन १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.अन हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कधी झाला हे कोणालाही कळाले नाही. जिल्ह्यातील अपवाद वगळता सगळे आमदार, खासदार राष्ट्रवादीचे, जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य संस्थांवरही पवारांचा प्रभाव दिसून आला.
गत लोकसभा निवडणुकीतही उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर सातारची जागा लढवली आणि ते खासदार झाले. पण ४ महिन्यातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला हे समजले नाही.या मतदारसंघात पोट निवडून झाली मात्र त्यानंतर राजेंनी पुन्हा भाजपचे कमळ हातात घेऊन मैदानात उडी मारलीच. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटलांनी त्यांचे विजयाचे काटे उलटे फिरवले. मग भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर संधी दिली हा तसा ताजाच इतिहास आहे.
सध्या उदयनराजे भोसले राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाल अजून बराच बाकी आहे. पण त्यांना लोकसभेची आस आहे. त्यामुळेच पुन्हा ते भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठीकठिकाणी मेळावे सुरू आहेत. असाच एक महायुतीचा मेळावा मंगळवारी कराडात झाला. महायुतीचे अनेक नेते या मेळाव्याला उपस्थित होते. पण अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त करताना पवारांच्या प्रभावाची धास्ती घेतल्याचे दिसून आले.
दस्तूरखुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आपण काहीही म्हटले तरी जिल्हा हा 'जाणत्या राजाला' मानणारा जिल्हा आहे. या मतदारसंघातील माणसं ही काही विचाराशी बांधली गेलेली आहेत. तेव्हा त्यांना त्या विचारापासून बाजूला करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार इथे निवडून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्याला उमेदवारी मिळेल त्याने सूक्ष्म नियोजन करून प्रचाराची गती वाढवावी लागेल.
'पवार भिजले, वातावरण फिरले'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनीही आपल्या भाषणात गत लोकसभेच्या आठवणींना उजाळा दिला. प्रचार सभेदरम्यान आलेल्या पावसात 'शरद पवार भिजले आणि सगळे वातावरण फिरले' असे त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्ह्यातील शरद पवारांच्या प्रभावाची अप्रत्यक्ष त्यांनी आठवणच करून दिली.
त्यात यांनी वाढवली डोकेदुखीमहायुतीच्या मेळाव्यात अनेक वक्त्यांनी शरद पवारांच्या जिल्ह्यातील प्रभावावर वक्तव्ये केली.तो प्रभाव कमी करुन विजयाप्रत जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. पण महायुती बरोबर असणार्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकार्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने, दांडी मारल्याने महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे.