- दीपक शिंदेसातारा - सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून खा. उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांच्यात अत्यंत चुरशीची आणि तगडी लढत पहायला मिळणार आहे. निवडणूक प्रचारापूर्वीच शशिकांत शिंदे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असतानाच निष्ठावंत आणि आपला, कामाचा माणूस म्हणून प्रतिमा लोकांसमोर नेण्यात ते किती यशस्वी होतात हे महत्त्वाचे ठरणार आहे तर, उदयनराजेंसोबत मित्रपक्ष किती भक्कम उभे राहणार यावर त्यांचे निवडणुकीतील गणित ठरणार आहे.
सातारा लोकसभेसाठी खा. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळते किंवा नाही याबाबत गेले महिनाभर चर्चा सुरू होती. खा. उदयनराजे आणि जवळचे चार- पाच लोक सोडले तर, उमेदवारीबाबत कोणालाच खात्री नव्हती. प्रत्येक जण संशयाने एकमेकांकडे पाहत होते. अखेर मतदारसंघांच्या तडजोडीने उदयनराजेंची उमेदवारी निश्चित झाली. तरीदेखील त्यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी लढण्याची तयारी दाखविली होती. गुरुवारी दि.१८ रोजी उमेदवारी भरण्याचा निश्चयही केला होता. या सर्वांचा विचार करता त्यांना डावलणे भाजपला जड गेले असते, त्यामुळे अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आ. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. अजून मुख्य प्रचाराला सुरुवात व्हायची आहे. तोपर्यंतच त्यांच्याच जुन्या मतदारसंघातील कोरेगावचे आ. महेश शिंदे यांनी त्यांच्यावर नवी मुंबई बाजार समितीतील दुकान गाळे विक्रीप्रकरणी आरोप केले. त्यानंतर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी तुतारीच्या उमेदवाराने मुतारीच्या प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला. सुरुवातीलाच असे आरोप झाल्याने आता निवडणूक रिंगणात प्रत्यक्षात उतरल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना अधिक धार येणार आहे.
विधान परिषद आणि राज्यसभेचे नेते लोकसभेसाठी भिडणारसातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पोटनिवडणूक लढताना पराभव झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. तर, कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी पराभूत झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेची आमदारकी दिली. दोन्ही उमेदवार हे मागील दाराने विधिमंडळामध्ये प्रवेश करणारे नेते होते. त्यांना आता लोकांमधून निवडून जायचे आहे. या निवडणुकीत ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
आव्हाने आणि बलस्थानेदोन्ही उमेदवारांसमोर सातारा लोकसभा मतदारसंघातील अडचणी आणि विकासाचा अनुशेष दूर करून विकासकामे करण्याचे आव्हान असणार आहे. येथील एमआयडीसी, आयटीपार्क, रस्ते, पाण्याचा प्रश्न, दुष्काळ आणि पायाभूत सुविधा यावर लक्ष देत असतानाच युवकांसाठी रोजगार आणि महिलांचे संघटन हादेखील महत्त्वाचा विषय असणार आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्यासोबत मोठा युवक वर्ग जोडला आहे. या युवकांना एकत्रित ठेवून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा लागेल. त्याचप्रमाणे शशिकांत शिंदे यांच्याकडेही सर्वसामान्य माणूस आशेने पाहतो. त्या प्रत्येकाच्या अपेक्षांना पात्र ठरण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे.