सातारा: जीएसटी कार्यालयामध्ये नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून ११६ तरुणांकडून तब्बल ४२ लाख ७३ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मारुती गुलाबराव मोहिते (रा. राजाळे, ता. फलटण), रवी अंकुश वनवे (रा. मलटण, ता. फलटण), चंद्रजित अनिल पाटील (रा. कुंडलापूर, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), संदेश लोटलीकर (रा. मुंबई), नितीन चतुर्वेदी, सचिन चतुर्वेदी (रा. मधुरा, राज्य उत्तरप्रदेश), कैलास भारत दोशी (रा. लक्ष्मीनगर, फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण आणि साताऱ्यातील तब्बल ११६ मुलांना वरील संशयितांनी जीएसटी कार्यालयामध्ये विविध पदांवर नोकरी लावतो, असे आमिष दाखविले. यानंतर संबंधित तरुणांकडून दीड ते दोन लाख रुपये उकळले. अशी एकूण त्यांनी ४२ लाखांची रक्कम उकळल्यानंतर तरुणांशी संपर्क बंद केला. त्यामुळे तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच तरुणांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील काही संशयितांना ताब्यातही घेतले आहे. या टोळीकडून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता असून, अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.महाराष्ट्राचे कनेक्शन उत्तरप्रदेशापर्यंत
या टोळीमध्ये फलटणपासून मुंबई, सांगली व्हाया उत्तरप्रदेश असे कनेक्शन आहे. जीएसटी कार्यालयात सरकारी नोकरी लावतो, असे सांगणारे हे उत्तरप्रदेशमधील आहेत. या मुख्य सूत्रधारांना महाराष्ट्रातील काही एजंट बेरोजगार तरुण त्यांच्याकडे घेऊन जात होते, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.