Maharashtra Politics ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची काल घोषणा झाली असून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. काही ठिकाणी उमेदवारीसाठी नेत्यांनी उघड-उघड बंड करण्याचे संकेत दिले आहे. राज्यातील काही मतदारसंघात ही परिस्थिती आहे. साताऱ्यात महायुतीला झटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ( शिंदे गट) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी याबाबत आता स्पष्ट संकेत दिले आहेत.
शिंदे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. सध्या वाई विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे मकरंद पाटील आमदार आहेत. यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता पुरुषोत्तम जाधव हाती तुतारी घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आता शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये खासदार शरद पवार गटामधून निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पुरुषोत्तम जाधव म्हणाले, आम्ही पूर्ण मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली. यावेळी सध्याचे आमदार आहेत त्यांच्याबाबत जनतेमध्ये असंतोष असल्याचे दिसून आले. त्यांनी सगळी पद घरातच पाहिजेत अशी भावना आहे त्यामुळे त्यांना आता प्रचंड विरोध होत आहे. एकनाथ शिंदे जेव्हा बाहेर तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. तेव्हा त्यांनी मला वाई विधानसभेची बांधणी करा म्हणून सांगितली, तशी मी तयारीही केली आहे. पण अचानक अजित पवार महायुतीमध्ये आले त्यामुळे आता विद्यमान आमदार म्हणून त्यांनाच संधी मिळत आहे. मी लोकसभा निवडणूकही लढणार होतो पण मला देवेंद्र फडणवीस यांनी थांबवलं. त्या निवडणुकीत मी एक ते दीड लाख मत घेतली असती तर महायुतीचे उमेदवार धोक्यात आले असते. दरवेळी मला थांबवलं जात, आम्ही सर्वसामान्यांनी राजकारणात यायचं की नाही असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असं सांगत पुरुषोत्तम जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.
'संधी मिळाली तर सोनं करणार'
"शरद पवार यांचा सातारा जिल्हा बालेकिल्ला आहे, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशीच लढत होणार आहे. आतापर्यंत खंडाळा तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, मी गेली वीस-बावीस वर्ष संघर्ष करतोय. माझ्यावर कोणताही आरोप नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी मी एक सक्षम पर्याय होऊ शकतो. मी लढणार आहे, मला संधी हवी आहे. मला संधी दिली तर संधीच सोनं करेन, असं सांगत पुरुषोत्तम जाधव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले.