Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आज कराड येथे महायुतीची सभा पार पाडली. या सभेतून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. "पूर्वी हा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आता या बालेकिल्ल्याचे सगळे बुरुज ढासळले आहेत, असा टोला शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.
यावेळी सभेत बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, "पूर्वी हा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आता या बालेकिल्ल्याची अवस्था अशी झाली की, सगळे बुरुज ढासळले आहेत. तटबंदी जी आहे ती नेस्तनाबुत झाली आहे. आता मनोजदादांना निवडूण देऊन समोरचा दरवाजा फोडायचा आहे. बाकी सगळा बालेकिल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेरला आहे. आता बाकी दरवाजा फोडण्याच काम कराड उत्तरच्या जनतेने करावा, असा निशाणा शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.
खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
देवेंद्र फडणवीस आज इतकं काम करतायेत, जो माणूस काम करतो त्याला आज धमक्या मिळतायेत. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. माणसांनी काम करायचं नाही का?, मग अशा व्यक्तीच्या मागे, पक्षामागे, युतीमागे आपण उभं राहणार नसेल तर कुणाच्या मागे उभं राहायचं हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं.
कराडच्या जाहीर सभेत उदयनराजे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र इथल्या लोकांना केवळ झुलवत ठेवलं गेले. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न होते, ते सोडवले नाहीत. राजकारणात सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फक्त आश्वासने दिली. आश्वासन देताना आपण जेव्हा लोकांसमोर जातो, आशीर्वाद देत आमदार, खासदार बनवतात. मात्र लोकांचं ऋण कधी फेडले गेले नाही. त्यामुळे फार याकडे लक्ष देऊ नका. वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र अशी म्हण आहे. आधीच्या काळात योजना पूर्ण झाल्या असत्या तर तेव्हाचे तरूण जे आज त्यांचे वय झाले त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले नसते. लोकांची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे यादृष्टीने आम्ही कार्यरत असणार आहे असं त्यांनी सांगितले.