सातारा : ‘नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवरायांशी का तुलना केली जातेय, हेच कळत नाही. शिवरायांशी कोणाचीही तुलना करणे योग्य नाही आणि महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही,’ अशी जहरी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
साताऱ्यातील सैनिक स्कूल येथे मंगळवारी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मंत्री पाटील यांच्या प्रमुुख उपस्थितीत पार पडला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीकास्त्र सोडले.मंत्री पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. तरीही नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी वारंवार तुलना का केली जातेय, हेच कळत नाही. या गोष्टीचा प्रचंड राग येत आहे. अशा गोष्टी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. भाजप इतिहास बदलू पाहत आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने केवळ इतिहास पुसण्याचेच काम केले आहे. हे आम्ही पाहिले आहे.’
‘दिल्लीत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहºयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर तानाजी मालुसरे यांच्या चेहºयावर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. याबाबत छेडले असता ‘कुठे तानाजी मालुसरे आणि कुठे अमित शहा?’ असे म्हणत मंत्री पाटील यांनी अमित शहांवरही तोफ डागली.
साता-यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातील जिहे-कटापूरचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. येत्या एक-दोन महिन्यांत याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. मेडिकल कॉलेजचा प्रश्नही लवकरच सुटेल. बाळासाहेब पाटील हे साताºयाचे पालकमंत्री आहेत. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नक्कीच पाठपुरावा करतील,’ असेही मंत्री पाटील म्हणाले.