महाशिवरात्री उत्सव म्हटले की महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मलकापूरसह परिसरातील महादेव मंदिरातही महाशिवरात्रीला मध्यरात्रीपासूनच गर्दी होते. पाचवडेश्वर व आगाशिव डोंगरावरील आगाशिवनाथाच्या मंदिराचे परिसरातील गावात चांगलेच महात्म्य आहे. आटके, दुशेरे, कोडोली व नारायणवाडी या गावातील बहुतांशी भाविक पाचवडेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. तर आगाशिव डोंगराभोवतालच्या मलकापूरसह कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूर, मुनावळे, धोंडेवाडी, विंग, चचेगांव व आगाशिवनगर येथील भाविक आगाशिवनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. चचेगांव, जखिणवाडी, धोंडेवाडी गावातील तर काही भाविक बारमाही प्रत्येक सोमवारी डोंगरावर जाऊन महादेवाला अभिषेक करतात. तसेच या गावातील भाविकांसह सकाळी फिरण्यासाठी जाणारे व महाविद्यालयीन युवक युवतींचीही नेहमीच गर्दी असते. महाशिवरात्री असल्यामुळे दोन दिवस अगोदरपासूनच भाविकांनी हरहर महादेवचा गजर करत आगाशिव डोंगरावर गर्दी केली जाते.
महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबचलांब रांगा लागल्या जातात. मात्र, यावर्षी वेगळेच चित्र पहायला मिळाले. सकाळपासूनच मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमी गजबजलेल्या महादेव मंदिरात शुकशुकाट जाणवत होता. त्यामुळे आगाशिव डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची तुरळक उपस्थिती होती.
फोटो : १३केआरडी०१
कॅप्शन : महाशिवरात्रीला आगाशिव डोंगरावर भाविकांची गर्दी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (छाया : माणीक डोंगरे)