शिरवळ : शिरवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडीच्यानिमित्ताने नवीन राजकीय समीकरणे उदयास आली. भाजप-शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सुनील देशमुख हे दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नूतन उपसरपंच देशमुख यांचा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सत्कार केल्याने खंडाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादीच्या गटातटाला भाजप-शिवसेनेची- काँग्रेसची फूस तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि शिरवळमध्ये बिघाडी अशी म्हण प्रचलित झाली आहे.
शिरवळच्या उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. यामध्ये राष्ट्रवादीकडून रिजवाना काझी यांनी तर शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये भाजप-शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सुनील देशमुख यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाली. समसमान नऊ मते पडल्यानंतर भाजपच्या शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्या निर्णायक मताच्या जोरावर राष्ट्रवादी बंडखोर उमेदवार सुनील देशमुख यांनी एका मताने बाजी मारली. यावेळी शिरवळच्या राजकारणामध्ये उपसरपंचपदाचा जल्लोष साजरा करताना पहिल्यांदाच भाजप-शिवसेनेबरोबर काँग्रेसचे शिरवळ अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे खंडाळा तालुका उपाध्यक्ष ऋषिराज मोहिते हेही सहभागी झाले. यामुळे नवीन समीकरणे उदयास आल्याची लक्षणे दिसली. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप-काँग्रेस अशी युती झाल्याची चर्चा शिरवळमध्ये रंगू लागली.
उपसरपंचपदी सुनील देशमुख हे निवडून आल्यानंतर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी शिरवळ येथील घरी जात सत्कार केला. यावेळी युवक काँग्रेसचे खंडाळा तालुकाध्यक्ष अतुल पवार, खंडाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष ऋषिराज मोहिते, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, भादवडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच मनोज पवार उपस्थित राहिले. विशेषतः राष्ट्रवादीत जाण्यापूर्वी सुनील देशमुख हे काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. शिरवळमध्ये जुळलेल्या नवीन समीकरणाचे प्रस्थ तालुक्यात पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
चौकट
आनंदोत्सवावेळी भाजप दूर
राष्ट्रवादी विरोधात भाजप-शिवसेना-काँग्रेस हे नवीन समीकरण अस्तित्वात आले असले तरी देशमुख यांच्या निवडीनंतर जल्लोषाकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फिरवलेली पाठ चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे नव्याने अस्तित्वात आलेली तीन पक्षांची आघाडी राष्ट्रवादीला खंडाळा तालुक्यात टक्कर देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात खंडाळा तालुक्यात होणाऱ्या राजकीय घडामोडी जिल्ह्याच्या राजकारणात लक्षवेधी ठरणार आहे.
३०शिरवळ
शिरवळच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बंडखोर सुनील देशमुख यांची निवड झाल्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, काँग्रेस उपाध्यक्ष हृषीराज मोहिते उपस्थित होते.