सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली असून मतदारसंघ कोणाकडेही जाऊ द्या, पण, एकी कायम ठेवणे आणि वज्रमूठ घट्ट ठेवण्याचा निर्धार प्रमुख नेत्यांनी केला आहे. तसेच तालुकानिहाय दाैरे, सभा घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसून आले आहे.सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष आणि विविध संघटनांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.सातारा मतदारसंघ कोणत्याही पक्षाला मिळो पण, एकसंधपणे निवडणूक लढविणे, जिल्हास्तरावर समिती स्थापन करणे, जिल्ह्याचा स्वतंत्र जाहीरनामा काढणे, वज्रमूठ सभा घेणे, बुथ कमिटीत सर्वांना सामावून घेणे आदींसह इंडिया आघाडीची लढाई खूप मोठी आहे. एकत्र आलो तर मोठी क्रांती होईल. या क्रांतीसाठी हीच योग्य वेळ आहे, असे ठरविण्यात आले.तर माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही यापुढे सुरुच राहणार आहे. तीच भारताची लोकशाही म्हणून ओळखली जाईल अशी भीती आहे. त्यामुळे भाजप शासन मोदी सरकार असा प्रचार करत असून त्याविरोधात आवाज उठवणे गरजेचा आहे. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन आपला कोणी उमेदवार असेल तो कसा विजयी होईल याकडे पाहिले पाहिजे असे स्पष्ट केले.माजी मंत्री सतेज पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीच्या लढाईसाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती गठीत करणे गरजेचे आहे. यामध्ये त्यांनी निवडणुकीत वरिष्ठस्तरावरील मुद्दे न घेता स्थानिक घेणे आवश्यक आहे. बूथस्तरावर एजंट तयार करणे, गावोगावी कार्यक्रम घेणे, इंडिया आघाडीच्या सभा तालुकास्तरावर झाल्या पाहिजेत.भाजप सरकार तडीपार..अशी भूमिका डोळ्यासमोर ठेवूनच रणनीती आखली पाहिजे, असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही भाजपवर हल्ला चढवला. भाजप मोठ्या प्रमाणात सत्तेचा गैरवापर करत आहे. या बैठकीतून आपण सर्वजण एकत्र आलो ही सुरूवात आहे. आपला शत्रू एकच आहे. शत्रूला मारायचे असेल तर त्याच्या प्रमुख बळाच्या विरोधात एकीने लढले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील आदींनीही भाष्य केले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकी कायम; वज्रमूठ घट्टचा निर्धार...
By नितीन काळेल | Published: March 06, 2024 7:28 PM