सातारा : भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी १४ आॅक्टोबरपासून राज्यात शोधयात्रा काढणार असून आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. आमची संघटना आघाडीबरोबर आहे. त्यामुळे आघाडीने आम्हाला लोकसभेची एक, विधानसभेच्या सहा जागा द्याव्यात, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू,’ अशी घोषणा भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी केली. तसेच पवार भाजपबरोबर गेल्यास मी त्यांच्याविरोधात जाईन, असा इशाराही दिला.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. यावेळी संघटनेचे सरचिटणीस नारायण जावलीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.‘उपरा’कार माने म्हणाले, ‘भटक्या विमुक्त जमाती संघटनेची बैठक झाली. यामध्ये भटक्या विमुक्तांच्या न्याय, हक्कासाठी आणि लोकशाही संविधानाचा शोध घेण्यासाठी १४ आॅक्टोबरपासून राज्यात शोधयात्रा सुरू करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातून यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर या यात्रेचा समारोप ६ डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे.ही शोध यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यातून जाणार आहे. कारण, आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला भटक्या विमुक्तांचे प्रश्न सुटावेत असे मनापासून वाटलेले नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही समाज उपेक्षितांचे जगणे जगत आहे. यासाठीच आम्ही महाविकास आघाडीकडे लोकसभेची लातूर किंवा यवतमाळ ही जागा मागणार आहोत. तसेच विधानसभेचे सहा मतदारसंघ आम्हाला हवे आहेत. सहा प्रादेशिक विभागातील कोणतेही मतदारसंघ दिले तर आमचे लाेकप्रतिनिधी निवडूण येतील.या शोध यात्रेदरम्यान, लोकांना भाजपला किंवा संघाला मतदान करु नका असे सांगणार असल्याचे स्पष्ट करुन माने पुढे म्हणाले, संघाच्या विचारधारेने देशाचे नुकसान केलेले आहे. देशातील हे सरकार घालविल्याशिवाय गप्प बसणार नाही. देशातील या सरकारने पुढील निवडणूक यंत्राद्वारे न घेता मतपत्रिकाद्वारे घ्यावी हीच आमची मागणी राहणार आहे.
पवार कुटुंबातील भांडण वैचारिक...शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चारवेळा भेट झाली आहे. त्यांच्यातील वाद खरे आहेत का ? पत्रकारांनी असा प्रश्न केल्यावर माने यांनी पवार कुटुंबातील हे भांडण वैचारिक असल्याचे स्पष्ट केले. तर अजित पवार यांच्यानंतर शरद पवार भाजपबरोबर जातील का ? असा प्रश्न केल्यावर शरद पवार राजकारण सोडून घरी थांबतील. पण, भाजपबरोबर कधीही जाणार नाहीत. तरीही ते गेले तर त्यांच्याविरोधात मी जाईन, असे माने यांनी ठामपणे सांगितले.