शेंद्रे : सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद शेंद्रे गटातील भाटमरळी गावाने पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत एक नवीन ऐतिहासिक निर्णय घेऊन, सर्व समाजासमोर आदर्श निर्माण केला. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन भाटमरळी या गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करत, ग्रामपंचायत सदस्यपदी सर्व महिलांची निवड केलेली आहे.
ग्रामपंचायतीमध्ये तीन खुला, तीन ओबीसी आणि एका मागासवर्गीय गटातून महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत ग्रामस्थांनी अत्यंत सकारात्मक चर्चा करून, गेली पंचवीस वर्षे सुरू असणारी बिनविरोधची परंपरा अखंड ठेवली आहे. यामध्ये गावाचा विकास हा मुद्दा विचारात घेऊन सर्व इच्छुक सदस्यांनी गावाचे म्हणणे मान्य करून आपली उमेदवारी ग्रामसभेत मागे घेतली आणि गावाच्या बिनविरोध निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला.
ग्रामपंचायत सदस्या म्हणून मीना सुभाष देशमुख, निर्मला माणिक चव्हाण, नीलम प्रताप जाधव, मीनल गजानन जाधव, मोनाली भीमराव जाधव, गौरी सचिन क्षीरसागर आणि सुष्मिता राहुल आडागळे या सात महिला सदस्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांमार्फत त्यांचे कौतुक करण्यात आले. ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचा मोलाचा वाटा राहिला.