खटाव : जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू असताना भुरकवाडी (ता. खटाव) येथे मात्र नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून भुरकवाडी ग्रामस्थांनी एकीच्या जोरावर षटकार मारून सलग सहाव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून महिलाराज देण्याचा यशस्वी प्रयोग राबवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील महिलांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून राज्यात पहिले महिला धोरण आणत महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले आहे. शरद पवार यांच्या विचारधारेवर चालत असताना भुरकवाडी ग्रामस्थांनी मात्र ग्रामपंचायतीमध्ये सात महिला सदस्यांची बिनविरोध निवड केली आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून ललिता कदम, मनीषा कदम, शीतल कदम, रेश्मा कदम, रंजना कदम, सुजाता गाढवे, सुलोचना कुंभार यांची निवड केली आहे.
गावामध्ये महिला पदाधिकारी म्हणून सोसायटीच्या संचालिका सुशीला कदम, सुलोचना पवार काम पाहत आहेत तर अधिकारी म्हणून ग्रामसेविका धनश्री गमरे, आरोग्यसेविका जंगम, प्राथमिक शाळेच्या दोन महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका शुभांगी कदम, मनीषा चव्हाण, मदतनीस सुमन कदम, रंजना कुंभार, आशा सेविका रेश्मा फडतरे, सीमा जाधव काम पाहत आहेत.
१९९५ सालापासून कै. गणपतराव कदम (आबा) कै.रामभाऊ पाटील यांच्या व ग्रामस्थांच्या कल्पकतेतून आजही २०२१ पर्यंत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा इतिहास कायम ठेवत २०२१ पर्यंत सलग ३० वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबरोबर सातही महिला सदस्य देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. या बिनविरोध निवडीकामी गावातील ग्रामस्थांबरोबर महिला वर्ग, तरुण वर्गानेही उत्स्फूर्तपणे भाग घेऊन राज्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
११भुरकवाडी
कॅप्शन : भुरकवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या नूतन महिला सदस्यांसमवेत ग्रामसेविका धनश्री गमरे उपस्थित होत्या.