सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले.
आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकांसाठी चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरातून वाट पाहात आहे. 21 तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असे म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं. एका बाजुला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. निवडणुकीत विरोधकच नाहीत. आम्हाला दुसऱ्याबाजुला पैलवान दिसतच नाहीत. या तालुक्यात अनेक पैलवान आमच्या नेत्यांनी तयार केले आहेत. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोभत नाहीत. येत्या 21 तारखेचा निकाल हा सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सांगेल. खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा हा जिल्हा असल्याचं पवारांनी सांगितंल.
भरपावसात रात्री 8 वाजता पवारांची सभा सुरु होती. या सभेला व्यासपीठावर पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत होते. पवारांच्या हे रुप पाहून सातारकर भारावले होते, तसेच पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता. पावसात भिजत उपस्थित नागरिकांनीही सभेला गर्दी केली होती. आपल्या खिशातील रुमाल काढून, डोक्यावर छत्री घेऊन कार्यकर्त्यांनी सभेला प्रतिसाद दिला.
व्हिडीओ -