कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा मार्गावरील सैदापूरमधील कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी यादरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अपघातांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तेथून पुढे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गटारामधील कचरा पसरतोय उपमार्गावर
कऱ्हाड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यामध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येऊन पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. कऱ्हाडपासून सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची ठिकठिकाणी अशी दुरवस्था झाली असून त्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मलकापूर, नांदलापूर, पाचवड फाटा, आटके, नारायणवाडी, वाठार, मालखेड अशा ठिकाणी गटारात कचरा साचत आहे.
ढेबेवाडी मार्गावर प्रवासी थांबा शेड उभारणे गरजेचे
कऱ्हाड : तालुक्यात कऱ्हाड-ढेबेवाडी मार्ग ते कऱ्हाड-पाटण मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित विभागाने एसटी थांबा प्रवासी शेड हटविलेले आहेत. पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना उघड्यावर उभे राहून एसटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रवासी शेड हटविलेले आहेत. अशा ठिकाणी तत्काळ शेड उभारण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कऱ्हाड शहरातील रस्ते होताहेत चकाचक
कऱ्हाड : शहरात सध्या पालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची, बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचीही आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. पालिकेच्यावतीने शहरातील सार्वजनिक रस्ते, दुभाजक, पादचारी मार्गावर अग्निशमन बंबाच्या सहाय्याने वेळोवेळी औषध फवारणी तसेच पाणी मारून स्वच्छता केली जात आहे. तसेच ज्याठिकाणी कचरा साचतो तो परिसरही पालिकेकडून स्वच्छ केला जात आहे. त्या परिसरात औषध फवारणी केली जात आहे. परिसर निर्जंतूक करण्यासाठी सध्या पालिकेकडून कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.
पांढरेपाणी गावच्या रस्त्यावरील दिवे बंद
पाटण : पांढरेपाणी, ता. पाटण या गावातील रस्त्यावर विजेच्या खांबावरील दिवे बंद आहेत. बंद असलेल्या या दिव्यांमुळे पांढरपाणी गावात सायंकाळनंतर अंधार असतो. तर असणारे दिवेही उशिरा लावले जात आहेत. विजेचे दिवे लावण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे. हे गाव जंगलात असून, वन्यप्राण्यांचा तेथे मोठया प्रमाणात वावर आहे. त्यामुळे या गावातील विजेच्या खांबावरील दिवे पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उंडाळे विभागातील तुळसण मार्गावर खड्डे
उंडाळे : उंडाळे विभागातील उंडाळे ते तुळसण फाटा या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून पाईप लाईनसाठी रस्त्यामध्ये चर काढण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाकडून दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. उंडाळे ते तुळसण फाटा हा रस्ता शेतकऱ्यांनी आपली जमीन देऊन केला आहे. उंडाळे ते तुळसण फाटा दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेने झाडे-झुडपे वाढली आहे. या रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीची मागणी होत आहे.