सांगली : जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार बिले दिली नाहीत. मागील हंगामाची बिले दिल्याशिवाय या वर्षीचा गळीत हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. एकरकमी एफआरपीची रक्कम व अंतिम दर ३७५० रुपये प्रतिटन मिळाला पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी दि. ६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर पुरोगामी, डाव्या आणि शेतकरी संघटना धरणे आंदोलन करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, २०१४-१५ या वर्षातील गळीत हंगामास गेलेल्या उसाची एफआरपीनुसार शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. यासाठी शासनाने अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक मदत करूनही कारखानदार शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. काही साखर कारखान्यांनी शासनाने दिलेल्या रकमेलाही कपात लावली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी पूर्वीची सर्व थकबाकी चुकती करावी आणि त्यानंतरच २०१५-१६ वर्षातील गळीत हंगाम सुरू करावेत. एफआरपीची रक्कम देणार नाहीत, अशा कारखान्यांना साखर आयुक्तांनी परवानगी देऊ नये. या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास कारखान्यांचे गळीत हंगाम बंद पाडण्यात येतील. यावर्षीच्या उसाला साखर कारखान्यांनी प्रतिटन ३७५० रुपये दर दिला पाहिजे. यापैकी एफआरपीची रक्कम एकरकमी दिली पाहिजे. उर्वरित रक्कम हप्त्याने दिल्यास आमची काहीही हरकत नाही. या प्रश्नावरच राज्यातील सर्व संघटनांच्यावतीने दि. ६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मागील चुकते करा, मगच हंगाम
By admin | Published: October 18, 2015 12:19 AM