सातारा : देशातील पहिले डिजेल इंजिन तयार करणाऱ्या कूपर उद्योग समूहाने ‘मेक इन सातारा’कडे वाटचाल सुरू केली आहे. कूपर उद्योग समूहाने बनविलेल्या ‘कूपर जनसेट’ने अमेरिकेलाही भुरळ घातली असून, हा जनसेट अमेरिकेच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कूपर इंजिनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ‘कूपर जनसेट’ने जागतिक बाजारपेठेत आपले स्थान मानांकित केले असून, साताऱ्याच्या इतिहासातही मानाचा तुरा रोवला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमासाठी अमेरिकन शिष्टमंडळ भारतात आले आहे. रविवार, दि. २५ रोजी हा उद्घाटन सोहळा कूपर उद्योग समूहामध्ये होत आहे. कूपर उद्योग समूहामार्फत बनविण्यात आलेल्या जनरेटमध्ये सीआरडीआय टॅक्नॉलॉजी असलेल्या इंजनचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. याच्या वापरामुळे ३० टक्के इंधन बचत होते. कूपर जनरेटरमध्ये १० ते २०० केव्हीए पर्यंत जनरेटर उपलब्ध आहेत. तसेच सीएनजी गॅसवर चालणारे १० ते १२५ केव्हीए,एलपीजीवर चालणारे १० केव्हीए ते २० केव्हीएचे जनसेट उपलब्ध आहेत. या जनसेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्यात आला असून हे जनसेट सीपीसीबी २ या नॉन्सची पूर्तता करतात. अत्यााधुनिक तंत्रज्ञान हे या जनसेटचे खास वैशिष्ट्य आहे. डिझेल इंजिननिर्मितीत प्रगतीचे सर्व उच्चांक कूपरने मोडले असून, आता ‘मेक इन महाराष्ट्र’ याबरोबरच ‘मेक इन सातारा’ बनविण्याकडे कूपर उद्योग समूहाची वाटचाल सुरू झाली आहे. कूपर उद्योगातील परिवर्तनाचे खरे जनक म्हणून फरोख कूपर यांच्याकडे पाहिले जाते. कूपर आणि सातारा जगाच्या नकाशावर भारतातील ‘इंजिन सिटी’ म्हणून ओळखली जाईल, यात शंका नाही. (प्रतिनिधी)
डिझेल इंजिननिर्मितीचा पहिला मान ४साताऱ्यातील स्मार्ट उद्योग म्हणून कूपर उद्योग समूहाकडे पाहिले जाते. या देशात डिजेल इंजिननिर्मितीचा पहिला मान कूपर यांच्याकडे जातो. गेल्या शंभर वर्षांमध्ये डिझेल इंधननिर्मितीतील सर्वश्रेष्ठ मान गुणवत्तेच्या निकषावर कूपरने मिळविला आहे. कूपर उद्योग समूहाने यंदा इंजिनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ‘कूपर जनसेट’ने जागतिक बाजारपेठेत साताऱ्याचे नाव उंचावले असून, आता अमेरिकन बाजारपेठेत कूपरचा हा वैशिष्ट्यूर्ण जनसेट जात आहे.
मशिनरी उद्योगात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ‘कूपर उद्योग समूहा’चा हा आधुनिक जनसेट अमेरिकेतही साताऱ्याचे नाव झळकवत आहे. साताऱ्यातील प्रत्येक उद्योजकाने ‘मेक इन सातारा’ची परंपरा जोपासल्यास साताऱ्याचे नाव नक्कीच जगात झळकेल. - फरोख कूपर