सातारा : सख्खा भाऊ पण म्हणतोय दुचाकी अपघातात भावाचा मृत्यू झालाय. पण मृत युवकाच्या अंगावरील मुका मार जेव्हा पोलिसांनी पाहिला. तेव्हाच इथ काही तरी काळबेरे आहे, याची शंका पोलिसांना आली आणि अखेर ही शंका खरी ठरली. अपघाताच्या बनावापूर्वी तरुणाचा खून झाल्याचे तपासात पुढं आले.
संशयित आरोपींनी अत्यंत थंडा डोक्याने अपघाताचा बनाव केला. एवढेच नव्हे तर अपघातप्रकरणी गुन्हाही दाखल केला. आता आपला कट यशस्वी झाला, या आयुर्विभावात असलेल्या आरोपींचे मनसुबे मात्र, खंडाळा पोलिसांनी उधळून लावले. दोन माजी सैनिकांसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली.
हनुमंत ऊर्फ प्रकाश सपंत यादव (वय ३९, रा. पारगाव खंडाळा), सचिन ऊर्फ बंडू नामदेव यादव (वय ४२, रा. माळवाडी, पारगाव, ता. खंडाळा), अभिषेक ऊर्फ गाैरव शिवाजी यादव (वय २२, पारगाव), विजय गणपत यादव (वय ३९), कुणाल ऊर्फ पंकज भानुदास यादव (वय २३, रा. पारगाव, ता. खंडाळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
प्रशांत प्रकाश पवार (वय २३, रा. आणवडी पो ओझर्डे, ता. वाई, सध्या रा. सांगवी फाटा, खंडाळा) या युवकाचा १२ डिसेंबर रोजी दुचाकीचा अपघात झाला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्याचा सख्खा भाऊ ओमकार पवार याने खंडाळा पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास केला असता मृत युवक प्रशांत पवार याच्या अंगावर काही जखमा दिसून आल्या. तर काही ठिकाणी त्याचे शरीर काळेनिळे पडले होते. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असू शकतो, अशी शंका खंडाळा पोलिसांना आली.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर एक एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. प्रशांतचा अपघात नव्हे तर खूनच झाला, हे समोर आलं. पण हे कशासाठी केलं हे जेव्हा पोलिसांनी संशयितांकडे चाैकशी केली. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
म्हणे तुम्ही मुलीवर अत्याचार केला
मृत युवक प्रशांत पवार, त्याचे वडील आणि भावाला या संशयितांनी एका खोलीमध्ये बेदम मारहाण केली. यातच प्रशांतचा मृत्यू झाला. तुम्ही एका मुलीवर अत्याचार केला. तसं त्यांनी व्हिडीओ शूटिंगही करून त्यांच्या तोंडून वदवून घेतलं. नंतर भाऊ ओमकार याला अपघाताच्या बनावाची तक्रार द्यायला लावली.