सातारा : जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांमधील जल आणि वायुप्रदूषणामध्ये वाढ होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या वापरामुळे निसर्गामध्ये होणारे प्रदूषण आणि पर्यावरणामध्ये होणारे बदल व त्यापासून होणारा भविष्यातील धोका विचारात घेऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पीओपीपासून बनविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मूर्ती उत्पादन, वितरण व विक्री रोखण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.सातारा जिल्ह्यामध्ये पीओपीपासून बनविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मूर्ती उत्पादन, वितरण व खरेदी-विक्री करण्यावर ६ जुलै २०२२ पासून बंदी घालण्यात येत आहे. ज्या मूर्तिकारांकडे पीओपीच्या मूर्ती असतील त्यांना ५ जुलै २०२२ पर्यंत त्याची विक्री करण्याची मुभा देण्यात येत आहे. पीओपीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती बनविण्यास, वितरण करण्यास, आयात करण्यास ६ जुलै २०२२ पासून प्रतिबंध करण्यात येत आहे. यानंतर पीओपीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आढळून आल्यास मूर्ती जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. पीओपीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती तयार करणाऱ्या, विक्री करणाऱ्यास तसेच खरेदी करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, पदाधिकारी, नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा आणि पर्यावरणविषयक कामकाज करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांची पथके तयार करण्यात आली आहेत.
साताऱ्यात पीओपीच्या मूर्ती बनविणे, विक्रीवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:15 PM