नांदेड जिल्ह्याच्या मुख्य शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर माळाकोळी हे गाव असून, या गावाची लोकसंख्या वीस हजार आहे. या गावात मुलगा जन्माला आला की, मंदिर उभारण्याचे धडे घेतो, असं म्हटलं जातं. घराघरात मंदिर कारागीर पहायला मिळतात. या माळाकोळी गावातील गुरू सोपान काका यांनी या गावाला महाराष्ट्रभर वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तरूण पिढीही यात सक्रिय झाली. ही पिढी आता संपूर्ण महाराष्ट्रात विभागली आहे. तशाच पद्धतीने साताऱ्यातही या गावातील कलाकार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. जिल्ह्यातील बहुतांश मंदिरे या माळाकोळी गावातील कारागिरांनी बांधली आहेत. अत्यंत नक्षीदार आणि आकर्षक अशी मंदिरे बांधण्यात या कारागिरांचा हातखंडा आहे. विशेष म्हणजे ज्याचे शिक्षण कमी तो कारागीर सर्वात चांगला, असे हे कारागीर मानतात. याची कारणेही अगदी मजेशीर आहेत. शिक्षण कमी असलेला कारागीर शाळेत गेलेला नसतो. त्यामुळे त्याला दिवसभर केवळ मंदिर बांधण्याचेच धडे मिळतात. त्यामुळे असा अशिक्षित कारागीर यात निष्णांत होतो. यालट जो शिक्षण घेतलेला असतो. तो फारसा कौशल्यपूर्ण नसतो. त्याला नव्याने सर्व शिकावे लागते. त्याला फारसे जमत नाही, असे या माळाकोळी गावातील कारागिरांचे मत आहे.
या गावातील घराघरात मंदिर बांधणारे कारागीर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या गावामध्येही आवडीने वेगवेगळ्या देवतांची मंदिरे बांधली आहेत. गावात पावलोपावली मंदिरे आहेत. या मंदिरांमुळेच आम्हांला चांगली मंदिरे उभारण्यास प्रेरणा मिळते, असे नामदेव पंदलवाढ सांगतात.
- दत्ता यादव, सातारा