कऱ्हाड : ‘मलकापूरची ‘क’ वर्ग नगरपालिका व्हावी, यासाठी आॅक्टोबर २०१३ पासून प्रयत्न सुरू आहेत. नगरपंचायतीने शासनाकडे याबाबतची विनंतीही केली आहे. ते विनंतीपत्र २५ जून २०१४ ला मी मुख्यमंत्री असताना मला मिळाले. मात्र, आचारसंहिता लागल्याने त्यापासून हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीनच आहे. नियमाप्रमाणे २५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाºया मलकापूर नगरपंचायतीला नगरपालिका करण्यास काहीही अडचण नाही. मात्र, याप्रश्नी मुख्यमंत्र्यांची कोणीतरी दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत विकास कामाला खो घालण्यापेक्षा अधिकाºयांचा कायदेशीर सल्ला घ्यावा,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड-मलकापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूर नगराध्यक्षा सुनीता पोळ, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘२०११ ची जनगणना हातात आल्यानंतर मलकापूरचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात आला आणि मग ‘क’ वर्ग नगरपालिका होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन तशी मागणी झाली. मध्यंतरी नियमाप्रमाणे हे होऊन जाईल, असे गृहीत धरून नगरपंचायतीने थोडासा पाठपुरावा केला; पण जास्त आग्रह धरला नाही. मात्र, इतर काही नगरपंचायतींना पालिकेचा दर्जा बहाल करताना मलकापूरची फाईल मात्र बाजूला ठेवण्यात आली आहे.’
पालिका दर्जा मिळाल्यास जादा निधी मिळू शकतो. कर्मचारीवर्ग जादा मिळू शकतो आणि शहराचा गाडा हाकताना मदत होऊ शकते. मी स्वत: याबाबत दोनवेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून माझ्या मतदारसंघातील काम आहे. नियमात बसणारे आहे. ते करावे अशी विनंती केली आहे. मात्र, ते होत नाही हे लक्षात आल्यावर यात काही तरी काळंबेर आहे, असे वाटू लागले आहे. काही विघ्नसंतोषी लोक या चांगल्या कामाला खो घालत असल्याची टीकाही त्यांनी केली. मात्र, नामोल्लेख करणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. २९ मे २०१७ ला मुख्यमंत्री फडणवीस कºहाडला आले होते. तेव्हा त्यांनी ‘क’ वर्ग नगरपालिका करण्यास अनुकूलता दाखविली होती. मात्र, आता नेमके काय झाले? हे कळत नाही. फाईल तयार आहे. त्यावर सही करायला त्यांना तीस सेंकदसुद्धा लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले....तर अधिवेशनात आवाज उठविणारमलकापूर नगरपालिका करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर येत्या पावसाळी अधिवेशनात आपण यावर आवाज उठविणार असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली. परंतु मुख्यमंत्री त्या अगोदरच सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सहा कोटींचा निधी मंजूरकऱ्हाड येथे रखडलेले शासकीय विश्रामगृह व मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाची इमारत यासाठी प्रत्येकी दहा-दहा कोटींचा विकास निधी मंजूर करावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत महसूलमंत्री पाटील यांचे नुकतेच मला पत्र प्राप्त झाले असून, या दोन्ही कामांना त्यांनी प्रत्येकी तीन कोटी निधी मंजूर केले असल्याचे सांगितले.तो निर्णय भाजपा घेईलपलूस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँगे्रसने उमेदवार उभा न करण्याचे जाहीर केले आहे. त्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी सांगितले; पण डॉ. पतंगराव कदमांच्या निधनानंतर रिक्त जागेवर होणाºया पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार उभा करायचा की नाही, याबाबतचा निर्णय भाजपच घेईल, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.मलकापूर नगरपालिका झाल्यावर जर नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी पडले तरीदेखील मनोहर शिंदे निवडणुकीला उभे राहणार नाहीत, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विरोध करणाºयांना स्वत:ला जरी या निवडणुकीला उभे राहायचे असेल तर त्यांनी उभे राहावे. मात्र, चांगल्या कामाला विरोध करू नये, अशी टीका माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी विरोधकांवर केली.