मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या वाढीव कर वसुलीला अन्याय निवारण समितीने विरोध करून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत ते नागरिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला. तसेच मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. यावर मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक व अन्याय निवारण समितीची बैठक दि. १८ एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीतर्फे देण्यात आली. मलकापूर नगरपंचायतीने कर वाढ केल्यापासून अन्याय निवारण समितीने याला विरोध केला आहे. मंगळवारी मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्या दालनात झालेल्या बैठकीवेळी अन्याय निवारण समितीचे अशोकराव थोरात, संजय जिरंगे, सुधाकर शिंंदे, अधिकराव शिंंदे उपस्थित होते. अशोकराव थोरात म्हणाले, ‘मुख्याधिकाऱ्यांकडे आम्ही माहितीसाठी आॅडिटच्या कॉपीसह इतर कागदपत्रे मागितली होती. मात्र आम्हास कागदपत्रे मिळाली नाहीत. सत्ताधारी जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत आहेत. ज्या ठिकाणी आमच्या शाळा आहेत, तेथे जाणीवपूर्वक रस्ते केले जात नाहीत. तुमचे आणि आमचे राजकीय वैर असले तरी सामान्य लोकांना आपण का त्रास देता. २४-७ योजनेची गरजच नाही. जास्त प्रमाणात व हवे तेवढे पाणी मिळाल्याने ते वाया जात आहे. ही योजना फसवी असून, नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. सत्ताधाऱ्यांनी समोरासमोर येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत.’ ‘मुख्याधिकारी राजेंद्र तेली म्हणाले, ‘मलकापुरातील आणि कऱ्हाडच्या नागरिकांना मिळणारे पाणी याचा विचार करता मलकापूरच्या लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पाणी योजना चांगली असून, त्यामुळे लोकांना वेळेत पाणी मिळत आहे. शिवाय पाण्याची बचत होत आहे. नागरिकांचे हित पाहूनच कोणतीही योजना राबवली जाते. प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी, संघटना आणि कार्यकर्ते यांचा समन्वय साधून समाजहिताचे काम करणे हे माझे कर्तव्य आहे. ते पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. सत्ताधाऱ्यांबद्दल असलेल्या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकत नाही. ते त्यांनाच विचारावे लागतील. प्रशासनाशी निगडीत प्रश्नाची उत्तरे देण्यास मी बांधिल आहे.’ (प्रतिनिधी)
मलकापूर नगरपंचायतीचा नागरिकांवर अन्याय
By admin | Published: April 01, 2015 10:02 PM