मलकापूर :
मलकापूर पालिकेने चालू कर व थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेच्या कर विभागाने वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. तरीही थकबाकी न भरलेल्यांवर सुटी दिवशीही कामावर हजर राहून धडक मोहीम राबवली. थकीत कर न भरल्यामुळे शहरातील नऊ मिळकतदारांचे पालिकेच्या पथकाने नळ कनेक्शन बंद करून पाणी बंद करण्याची कारवाई केली आहे.
येथील पालिकेने गेल्यावर्षी ८८ टक्के कर वसूल करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. यावेळी शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरात अठरा हजार मिळकतधारक आहेत. त्यापैकी काही मिळकतधारकांची पन्नास हजारांपेक्षा जास्त थकबाकी आहे. यावर्षी चतुर्थ वार्षिक करआकारणी लागू केली आहे. सुमारे ४ कोटी २५ लाखांवर वसुलीचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टपूर्तीच्या वसुलीसाठी कठोर उपाययोजना करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. पालिकेच्या हद्दीतील सुमारे १८ हजार मिळकतदारांपैकी थकबाकी असणाऱ्या काही मिळकतदारांसह शाळांची वसूली बाकी आहे. त्यानुसार थकीत कराच्या वसुलीसाठी पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
प्रथम नोटीस मिळाल्यापासून कर भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. या नोटिसीद्वारे कठोर निर्णय घेतले जाणार, असे सूचित केले होते. दोन वर्षे व त्यापेक्षा जुन्या थकीत कराची वसुली व्हावी म्हणून कर विभाग विशेष प्रयत्नशील आहे. नोटीस देऊनही थकबाकी न भरलेल्यांवर धडक मोहीम राबवली. शहरातील सहा मिळकतदारांचे पालिकेच्या पथकाने नळ कनेक्शन बंद करून पाणीबंद करण्याची कारवाई केली आहे.
या पथकात करनिरीक्षक राजेश काळे, तेजस शिंदे, मनोहर पालकर, बाजीराव येडगे, अविनाश मोहिते, ओंकार लोकरे, सोमाजी गावडे, सदाशिव येडगे, सचिन शिंदे, रामदास शिंदेसह कर्मचारी सहभागी झाले होते.
कोट
नोटिसा देऊनही थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांची मालमत्ता सील व नळ कनेक्शन बंद करण्यास सुरुवात केली आहे. या पर्यायानंतरही थकीत कर ठेवणाऱ्या मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव किंवा त्या मालमत्ता पालिकेच्या नावावर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुढील प्रक्रिया करणे. यापेक्षाही कठोर कारवाया करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
- राजेश काळे, करविभाग प्रमुख
चौकट
नऊ मिळकतदारांचे पाणी बंद
उत्तम बळवंत पवार, दिनकर तातोबा पोळ, रैनाक वस्ती प्रमोद मोरे, भाग्यश्री बेकरी, सूर्यकांत विश्वास बामणे, भोपाल परसू लोंढे, सर्वोदय बॅकवर्ड सोसायटी, दिनकर शंकर थोरात विनायक कॉलनी, मधुकर गोविंद साठे तडक वस्ती, यशवंत शंकर सातपुते, पांडुरंग विठोबा कुंभार आझाद कॉलनी या नऊ मिळकतदारांचे नळ कनेक्शन तोडून पाणी बंद केले.
फोटो
३०मलकापूर-पालिका
मलकापूरमधील थकबाकी असलेल्यांचे नळ कनेक्शन पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडले. (छाया : माणिक डोंगरे)