मलकापूर : मलकापुरात क्लोरीन गॅसचे प्रमाण वाढल्याने निर्माण झालेली अतिसाराची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गेल्या सहा दिवसांत क्लोरीनचे प्रमाण ०.३ पी. पी. एम. ते. ०.५ पी. पी. एम. पर्यंत नियंत्रित केले आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या तपासणीनुसार मलकापूरचे पाणी पिण्यायोग्य असल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. दरम्यान, अधिक तपासणीसाठी मलकापूरच्या पाण्याचे मुंबईत परीक्षण होणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. सर्व साधारणत: पाण्याची गढूळता पाहून निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन गॅसचे प्रमाण कमी-जास्त करावे लागते. त्याचे प्रमाण वाढून ३ पी. पी. एम. एवढे झाले होते. म्हणून १६ जुलैपासून शहरातील हजारो नागरिकांना अतिसाराच्या रोगाचा सामना करावा लागला. घटनेचे गांभीर्य ओळखून नगरपंचायत प्रशासनाने १७ जुलैपासून २० जुलैपर्यंत प्रत्येक दिवशीचे ठिकठिकाणचे पाण्याचे नमुने संकलित केले आहेत. ते नमुने कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालय सातारा जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्या पहिल्या दिवशीच्या पाण्यात क्लोरीनचे प्रमाण ३ पी. पी. एम. झाले असल्याचा अहवाल मिळाला. त्यानुसार तातडीने क्लोरीनचे प्रमाण कमी करण्यात आले. शहरातील विविध ठिकाणच्या नमुन्यांची तपासणी केली असता सध्या ०.३ पी. पी. एम. ते ०.५ पी. पी. एम. एवढ्या प्रमाणात क्लोरीनचे प्रमाण नियंत्रित करण्यात आले आहे. हे पाणी मागील सात वर्षांतील पाण्याप्रमाणे शुद्ध आहे. नागरिकांनी कोणताही संभ्रम न बाळगता डॉक्टरांच्या अहवालानुसार पाणी पिण्यायोग्य आहे. अधिक माहितीसाठी पाणी नमुने कऱ्हाड, सातारा बरोबरच मुंबईला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) कोणाचीही गय करणार नाहीमलकापूरच्या पाण्याचे नमुने विविध शासकीय पातळीवरील प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. आठ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. सखोल माहिती सादर करण्याबाबत मुख्याधिकारी व जलअभियंत्यांना सूचना दिल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर निश्चितच कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही मनोहर शिंदे यांनी स्पष्ट केले. आरोग्य केंद्राचे चांगले सहकार्य मलकापुरातील अतिसाराच्या परिस्थितीत काले प्र्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेंद्र यादव व त्यांचे सर्व कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. जे. कोरबू, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. एस. बी. मिसाळ, कृष्णा वैद्यकीय संशोधन केंद्राचे डॉक्टर, शहरातील सर्व डॉक्टरांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चांगलेच सहकार्य केले. तर नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी सर्व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनीधींनी सहकार्य केले.
मलकापूरच्या पाण्याचे मुंबईत परीक्षण !
By admin | Published: July 23, 2015 9:32 PM