लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अदालत वाड्यानजीकच्या मालशे पुलाच्या रुंदीकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पुलाखालील ओढ्याचे स्रोत तत्काळ खुले करावेत; अन्यथा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे .
जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मालशे पुलालगतच्या जागेचे बेकायदेशीर रुंदीकरण करताना शहर विकास विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. येथील ओढ्याला चुकीच्या पद्धतीने बंदिस्तीकरण व पुलाच्या बेकायदेशीर रुंदीकरणात पालिकेच्या काही अधिकाऱ्यांचे संगनमत आहे. खाजगी विकसकाच्या फायद्यासाठी शासनाच्या ५१ लाख रुपये निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे.
यासंदर्भात वारंवार पुरावे व नकाशे, तसेच तक्रार अर्जाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले तरीही कोणतीही कारवाई केली जात नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी व मालशे पुलाच्या खालील ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह तातडीने मोकळा करावा, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे. यावर कार्यवाही न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.