पळशी : आमदार झाल्यावर पहिल्या दिवसापासून माझा माण-खटाव मतदारसंघ विकासकामांच्या बाबतीत जिल्ह्यात रोल मॉडेल करायचा, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जयकुमार गोरेंने वाटचाल सुरू केली. पाणी योजनांसह मूलभूत विकासकामांचे भान ठेवून नियोजन केले आणि आजपर्यंत बेभान होऊन फक्त कामे आणि कामेच केली. माणदेशी प्रगल्भ जनता हे सर्व डोळ्यांनी पाहत आहे, त्यामुळेच गावोगावी विकासकामांचा आढावा घेताना प्रचंड प्रतिसाद मिळून जनता माझ्या पाठीशी असल्याचे चित्र दिसत आहे. कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर माझी वाटचाल निश्चित यशस्वी होईल,’ असा विश्वास आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.मार्डी जिल्हा परिषद गटातील हिंगणी, भाटकी, कारखेल, धुळदेव आदी गावांमधील वाटचाल वचनपूर्तीच्या संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी म्हसवडचे नगराध्यक्ष विजय सिन्हा, राजू पोळ, नगरसेवक अकील काझी, हरिभाऊ जगदाळे, दिगंबर राजगे, संतोष जगदाळे, हिंगणीचे सरपंच काकासाहेब माने, धुळदेवचे सरपंच अंबादास ढवळे, कारखेलचे सरपंच शशिकांत गायकवाड, भाटकीच्या सरपंच जयश्री कोडलकर, काकासाहेब हुंबे, अंकुश शिर्के, साधना शिर्के, नामदेव शिर्के, ग्रामपंचायत सदस्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.आमदार गोरे म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी खटाव-माणच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी दाखविलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याचा निश्चय करून पहिल्या दिवसापासून कामाला लागलो. गावोगावी भेट देऊन जनतेच्या अपेक्षा जाणून घेतल्या. ४० वर्षे विकासात मागे राहिलेल्या मतदारसंघात तो बॅकलॉग भरून काढायचे आव्हान समोर उभे ठाकले. भान ठेवून नियोजन केले आणि बेभान होऊन कामाला लागलो. मतदारसंघातील गावांना आणि जनतेला गेल्या पाच वर्षांत अनेक भेटी दिल्या. आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी असे कधी केलेच नव्हते. माणसाला माणसात ठेवायचेच नाही, असेच राजकारण आजपर्यंत झाले. सर्वसामान्यांना विकासप्रवाहात आणायला मी प्राधान्य दिले. कार्यक्रमास हिराप्पा कोडलकर, किसन कोडलकर, गुलाब सरतापे, शामराव कोळेकर, देवाप्पा मासाळ, सुग्रीव चव्हाण, बाळासाहेब मुलाणी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
माण-खटाव ‘रोल मॉडेल’ करणार
By admin | Published: August 29, 2014 9:28 PM