सातारा : मायलेकीवर कोयत्याने वार करणाऱ्या हणमंत अशोक देटके (वय ३०, रा. अंजली कॉलनी, शाहूपुरी सातारा) याला न्यायालयाने तीन वर्षे १० दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, संबंधित दोघी मायलेकी १६ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बुधवार नाक्यावरून मोळाचा ओढ्याकडे चालत निघाल्या होत्या. यावेळी हणमंत देटके हा तेथे आला. तू माझ्यावर विनयभंगाची दाखल केलेली केस मागे घे, तसेच माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणू लागला. याला संबंधित मुलीने आणि तिच्या आईने विरोध केल्याने देटके याने जवळ असलेल्या कोयत्याने आईच्या डोक्यात वार केला.
आईला वाचविण्यास पुढे आलेल्या संबंधित मुलीवरही त्याने हातावर वार केले. यामध्ये दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हणमंत देटकेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या प्र्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने हमणंत देटके याला तीन वर्षे दहा दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एम.एच. ओक यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी शमशुद्दीन शेख यांनी सहकार्य केले.