सातारा : सातारा शहराबरोबरच जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व दुष्काळी भागातही सोमवारी सायंकाळपासून चांगलाच पाऊस पडला. यामुळे फलटण तालुक्यातील बाणगंगा आणि माणमधील माणगंगा नदीला पूर आला. तर कोयना परिसरात पाऊस झाल्याने धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस होत आहे. यामुळे प्रमुख सर्व धरणे आॅगस्ट महिन्यातच पूर्णपणे भरली. परिणामी धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सतत विसर्ग करण्यात येत होता. विशेष म्हणजे यावर्षी कोयना धरणात दुप्पटीहून अधिक पाणी आले. तसेच कोयना, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसाने नवा उच्चांक निर्माण करण्याच्या दृष्टीने सुरूवात केली आहे.सोमवारी रात्रीपासून सातारा शहरात पाऊस सुरू होता. रात्रभर चांगलाच पाऊस झाला. यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत होते. पश्चिम भागातील कोयना, नवजालाही पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक होऊ लागली. परिणामी पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. तसेच पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला.
मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास धरणात १०५.१४ टीएमसी साठा होता. तर पायथा वीजगृहातून २१०० आणि दरवाजे एक फुटाने उचलून ९५४६ असा ऐकूण ११६४६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.पूर्व दुष्काळी भागातही चांगलाच पाऊस झाला. सोमवारी दुपारपासून माण तालुक्यातील काही भागात पावसास सुरूवात झाली.
रात्रीच्या सुमारासही दमदार पाऊस झाला. हा पाऊस मलवडी, सत्रेवाडी, शिंदी खुर्द या परिसरात झाला. त्यामुळे माणगंगा नदीला पाणी आले. तसेच फलटण तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. यामुळे बाणगंगा नदीला पूर आला. गेल्या दहा वर्षांतील मोठा पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. फलटण तालुक्यातील फलटण ते उपळवे रस्ता पाण्याखाली गेला होता. तर मांडवखडक येथील पूल पाण्यामुळे वाहून गेला. आदर्की परिसरातील मुसळधार पाऊस झाला आहे.