कऱ्हाड : पाणी प्रदूषणासह रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करीत जनशक्ती आघाडीच्या वतीने शहरातील आझाद चौकात रास्ता रोको करण्यात आला. दि. २० पर्यंत हे प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. शहरातील आझाद चौकात करण्यात आलेल्या रास्ता रोको वेळी जनशक्ती आघाडीतर्फे नगरसेवक विनायक पावसकर, विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, नगरसेवक विक्रम पावसकर, श्रीकांत मुळे, झाकीर पठाण, अरुणा शिंदे, बाळासाहेब यादव, सुरेखा पालकर, श्रीकांत आंबेकरी, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव उपस्थित होते. जनशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी शहरातील दत्त चौकपासून पालिकेपर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर आझाद चौकात येऊन रास्ता रोको करण्यात आला.यावेळी नगरसेवक विनायक पावसकर म्हणाले, ‘शहरातील रस्त्याच्या कामासाठी सहा कोटी शासनाकडून आले होते. मात्र पालिकेने ते ड्रेनेज कामावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षांत शहरात एकही विकासकाम लोकशाही आघाडीने केले नाही. आता सुरू असणारी कामे यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त खर्च केलेल्या निधीतून केली जात आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत शहरातील रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर तीव्र आंदोलन करू.’‘नागरिकांकडून पालिकेला नियमित कर भरला जातो. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना साडेतीन वर्षांत काहीच सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. या प्रकाराबद्दल पालिकेच्या मासिक सभेत प्रश्न मांडूनदेखील सत्ताधाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील रस्त्यांसाठी मिळालेले अकरा कोटी गेले कुठे? अद्यापही काम का झाले नाही ?,’ असा प्रश्न नगरसेविका स्मिता हुलवान यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. आझाद चौकात एक तास रास्ता रोको केल्यानंतर पलिकेमध्ये मख्याधिकाऱ्यांच्या कक्षापुढे सर्व नगरसेवकांनी ठिय्या मांडला. मुख्याधिकारी प्रशांत रोडे, बांधकाम विभागाचे एन. एस. पवार यांना शहरातील अपुऱ्या कामांबाबत विचारणा करून निवेदन दिले. (प्रतिनिधी)साहेब थांबा, रास्ता रोको सुरू आहे... शहरातील आझाद चौकात रस्ता रोको सुरू असताना अचानक माजी नगरसेवक फारूख पटवेकर यांची गाडीवरून एंट्री झाली. त्यावेळी जनशक्तीचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी त्यांना हात जोडून ‘साहेब गाडी थांबवा, रास्ता रोको सुरू आहे,’ अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत फारूख पटवेकर गाडी बंद करून त्याठिकाणी थांबले. अलीबाबा अन् वीस चोर रास्ता रोको सुरू असताना ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकरांनी लोकशाही आघाडीच्या कार्य पद्धतीवर ताशेरे ओढले. दंत कथांप्रमाणे ‘एक अलीबाबा अन् चाळीस चोर’ असतात त्याप्रमाणे पालिकेतही ‘एक अलीबाबा अन् वीस चोर’ आहेत. अशा शब्दात पावसकरांनी ताशेरे ओढले. नावाला फक्त लोकशाही पालिकेमधील सध्याची आघाडी ही लोकशाहीची नसून हुकूमशाहीची आहे. नावालाच फक्त लोकशाही. पालिकेतील प्रत्येक काम मात्र हुकूमशाहीनेच केले जात आहे, अशी टीकाही पावसकर यांनी केली.
‘लोकशाही’विरोधात ‘जनशक्ती’ रस्त्यावर
By admin | Published: February 18, 2015 9:39 PM