सातारा :
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी कऱ्हाड आणि खटाव तालुक्यांत दोन ठिकाणी सापळा रचून मंडलाधिकारी, तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीला लाच घेताना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
विनायक दिलीप पाटील (वय ३७, पद मंडलाधिकारी, रा. कऱ्हाड), खासगी व्यक्ती मंगेश उत्तम गायकवाड (वय ३२, रा. सुपने, ता. कऱ्हाड), जय रामदास बर्गे (वय ३२, पद तलाठी, रा. डिस्कळ, ता. खटाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील तलाठी जय बर्गे आणि खासगी व्यक्ती मंगेश गायकवाडला अटक करण्यात आली आहे. तर मंडलाधिकारी विनायक पाटील पसार झाला आहे. त्याचा एसीबीचे अधिकारी शोध घेत आहेत.
एका तक्रारदाराच्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्या सुनावणीवर आदेश काढून तशी नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे कऱ्हाडचा मंडलाधिकारी विनायक पाटील याने १५ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. हे पैसे खासगी व्यक्ती मंगेश गायकवाड हा घेताना रंगेहाथ सापडला. ही कारवाई झाल्याचे समजताच मंडलाधिकारी पसार झाला.
दुसरी कारवाई डिस्कळ, ता. खटाव येथे करण्यात आली. तक्रारदार युवक १९ वर्षांचा असून, त्याच्या जमिनीची खातेफोड नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी जय बर्गे याने त्याच्याकडे सुरुवातीला २० हजारांची मागणी केली. त्यातील १० हजार रुपये त्याने यापूर्वीच घेतले. उर्वरित १० हजार त्याला द्यायचे होते. तत्पूर्वीच तक्रारदाराने लाचलुचपत विभागात जाऊन लेखी रीतसर तक्रार केली. एसीबी पथकाने पडताळणी केली असता तलाठी बर्गे हा लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तलाठी जय बर्गे याने लाचेची ५ हजारांची रक्कम एका झेराॅक्स दुकानात ठेवण्यास सांगितली. त्यानुसार तक्रारदार युवकाने रक्कम दुकानात ठेवली. यानंतर बर्गे याने तेथे जाऊन लाचेची रक्कम घेताच एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वर्षभरात २३ लाचखोर सापडलेसातारा जिल्ह्यामध्ये वर्षभरात एकूण २३ लाचखोर सापडले असून, उज्ज्वल वैद्य यांनी पोलिस उपअधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सलग तीन लाचखोरांना त्यांनी रंगेहाथ पकडले. जिल्ह्यात सोमवारी लाचलुचपतच्या विभागाने डबल धमाका करून महसूल विभागाला चांगलाच हादरा दिला आहे.