वर्गातल्या मुली शाळा सुटल्यानंतर रोज कुठं जातात या चौकशीतून तिला क्रीडांगणाची ओळख झाली. प्रशिक्षक बंडू लोखंडे यांनी तिच्यातील टॅलेंट हेरून ही तर ‘लंबी रेस’ची चॅम्पियन बनेल हे मनोमन ठरवलं. माणदेशी चॅम्पियन्सच्या परिवारात ती इतकी रूळली की, वर्षभरातच अव्वल खेळाडू म्हणून ती नावारूपाला आली. गेल्या दहा वर्षांत लोकल टू ग्लोबल मॅरेथॉन स्पर्धांमध्ये यश संपादन करून रेश्मा दत्तु केवटे माणदेशी एक्सप्रेस ठरली.
म्हस्वडच्या केवटेमळ्यात राहणाऱ्या दत्तु आणि सीताबाई केवटे यांच्या कुटुंबात साधना, स्वाती, श्रध्दा यांच्यानंतर रेश्माचा जन्म झाला. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांनी कुटुंबाचा गाडा आखला. मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी प्रयत्न केले, पण अन्य गोष्टींसाठी आर्थिक अडचण असल्याने त्यांना मुलींना थांबवावे लागले. रेश्माला क्रीडांगणाची आवड लागेपर्यंत म्हसवडमध्ये माणदेशी चॅम्पियनसची स्थापना झाली होती. मैत्रिणींच्या साथीने रेश्मा मैदानावर सरावासाठी जाऊ लागली. सराव आणि आहार दोन्ही गोष्टी मिळत असल्यामुळे कुटुंबाला आर्थिक ताण जाणवला नाही. परिणामी ती अभ्यासाबरोबरच या सरावात व्यस्त होत गेली. वर्षभराच्या सरावानंतर तिने जिल्हास्तरापासून राज्यस्तरापर्यंतच्या स्पर्धा मारण्यास सुरुवात करून आपलं करिअर झोकात सुरू केलं.
राज्यासह देशात सुरू असलेल्या शेकडो स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तिने स्वत:सह गावाचेही नाव मोठं केले. धावण्याच्या स्पर्धांमधून मिळणाऱ्या बक्षिसातून तिने नुकतेच गावाकडे शौचालय बांधले. याविषयी रेश्मा सांगते ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकल्यानंतर मला तब्बल ५५ हजार रुपये मिळाले. हे पैसे इतरत्र खर्च न करता मी गावाकडच्या घरी शौचालय बांधले. आता आईसह भाऊ आणि वडिलांना उघड्यावर नाही जावं लागत, हे माझ्या खेळाचं यश आहे. शेतीविषयक अभ्यास करणारा भाऊ केशव याच्या शिक्षणाला वयस्क वडिलांबरोबरच माझाही हातभार लागतो ना तेव्हा धावण्याची उमेद आणि वाढत जाते. या खेळण्यानं माझं स्वत्व जागृत केलं. कुटुंब तेव्हा पाठीशी उभं राहिलं नसतं तर मीही अन्य तिघींसारखी संसाराच्या चक्रात अडकून पडले असते.’
पॉईंटर
५८ पदकं
३९ ट्रॉफी
७९ प्रमाणपत्र
माणदेशातून थेट अमेरिकेचा टप्पा गाठणारा गौरवास्पद प्रवास
चौकट
थेट अमेरिकेत जाऊन मार्गदर्शन
प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत रेश्माने मिळविलेले यश अनेकांसाठी मार्गदर्शक आहे. त्यामुळे तिचे अनुभव मांडण्यासाठी तिला अमेरिकेलाही आमंत्रित केले होते. माणदेशीच्या चेतना सिन्हा, प्रभात सिन्हा यांच्यासह तिने अमेरिकेतील खेळाडूंना मार्गदर्शन केलं. ‘त्यांनी इंग्रजीतून विचारलेले प्रश्न मला समजत होते, पण इंग्रजीत बोलता येत नसल्यामुळे मी मराठीतून उत्तर देत होते. हा अनुभव खूपच थरारक होता. कमी कपडे घालून आम्ही सराव करतो म्हणून नाकं मुरडणाऱ्यांकडे मी बघत बसले असते तर आज यांच्यापुढं बसता आलं नसतं, याचा मनोमन आनंद होतो’ असं रेश्मा सांगते.
कोट
धावपटू म्हणून रेश्माकडे शारीरिक क्षमता आहे, पण तिची स्पर्धा जिंकण्याची ऊर्मी आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तिची क्षमता केवळ अफाट आहे. सरावाला कधीही न कंटाळणारी ही खेळाडू देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरही अजूनही झळकवेल याची खात्री आहे.
- प्रभात सिन्हा, संस्थापक माणदेशी चॅम्पियन्स