दहिवडी : ‘शेवरी (ता. माण) येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुरड्यांनी शाळा बंद असल्या तरी ऑफलाईन शिक्षण घेत शिक्षक आकाराम ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली परसबागेचा केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे,’ असे उद्गार दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी काढले. परसबागेला भेट दिली त्यावेळी बोलत होते. यावेळी सभापती लतिका विरकर, रासपचे नेते बबन वीरकर उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, ‘गेल्या वर्षभरापासून राबवलेला माणदेश को-परसबाग हा उपक्रम खऱ्या अर्थाने न डगमगता मोठ्या नावीन्यतेची जोड देत कृतीयुक्त शैक्षणिक कल्पकतेने बहरत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सुयोग्य कलाकृती व परिश्रमाची आवड आणि त्यातून घराशेजारील उपलब्ध जागेत प्राप्त परिस्थितीत असणारी बी-बियाणी, औषधी वनस्पती, फुलझाडे व पालेभाज्या, फळझाडे या सर्वांचा समन्वय साधत कायम दुष्काळी अशा माणदेशी मातीतील सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली परसबाग म्हणजेच सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनासारख्या आपत्कालातील शिक्षणक्षेत्रातील श्रमसंस्काराची एक विशेष पर्वणीच म्हणावी लागेल.’
त्याविषयी माहिती घेऊन पायी जाऊन प्रातिनिधिक स्वरुपात गणेश पवार, हर्षदा हिरवे, सृष्टी पवार, संतोष सावंत यांनी लावलेल्या परसबागेला भेट दिली. तसेच परसबागेतील कल्पवृक्षाचे प्रातिनिधीक स्वरूपात पूजन केले. यावेळी शेवरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पौर्णिमा राजगे, उपसरपंच सचिन अहिवळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष हिरवे, बाळाबाई सावंत, राणी माळवदे, भारती मुळीक, माजी सरपंच संतोष सिंदकर, शालेय समिती अध्यक्ष मोहन हिरवे, शेवरी सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष जयसिंग राजगे, दादासाहेब माळवदे, देवा चव्हाण, नाना खरात, मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, ग्रामस्थ व पालक, नवतरुण आणि शिक्षकवृंद सुयोग्य सामाजिक अंतर राखत उपस्थित होते.
फोटो-शेवरी (ता. माण) येथील परसबागेला भेट देताना सभापती लतिका वीरकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, बबन वीरकर, आकाराम ओंबासे आदी उपस्थित होते.