म्हसवड : आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दुष्काळी माणमधील तरुणाई माणगंगा नदीपात्रातून धावली. ही अनोखी मॅरेथॉन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून गुरुवारी सकाळी आयोजित केली होती. म्हसवड ते पळशी अशी माणगंगा नदीपात्रातून मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.
माण-खटावचे कल्पक प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पिंकाथाॅन दहिवडी, माणदेशी मॅरेथॉन वडूज, माण मेडिकल असोसिएशन आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय माण-खटाव यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बी. एस. माने, डाॅ. संदीप पोळ यांच्यासह सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक व महसूल क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण, स्विप मतदार, माझे मुले - माझी जबाबदारी, आरोग्य संवर्धन, वृक्षारोपण व माणगंगा नदीकाठी बांबू लागवड करणे हे या स्पर्धेचे उद्देश होते. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर सध्या पूर्णपणे कोरड्या असलेल्या नदीपात्रातील वाळूतून स्पर्धक मार्गस्थ झाले. यात स्वतः आमदार गोरे, प्रांताधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार माने हेही सहभागी झाल्यामुळे स्पर्धकांचा उत्साह वाढला होता.
खड्डे, खाचखळगे, काटेरी वनस्पती, पाणी, सिमेंटचे बंधारे अशा अनेक अडथळ्यांवर मात करीत सर्वच स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत म्हसवडच्या सूरज लोखंडे याने प्रथम क्रमांक मिळविला; तर संतोष माने याने द्वितीय, विशाल वीरकर याने तृतीय, आकाश लोखंडे याने चतुर्थ, तर सुनील गायकवाड याने पाचवा क्रमांक मिळविला. स्पर्धेदरम्यान वाकी स्मशानभूमीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्पर्धकांना पाणी, चहा व बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती.
चौकट :
वाळूची लूट पाहून संताप...
माणगंगा नदीपात्र हे वाळूचे आगार समजले जाते. पळशी ते म्हसवडदरम्यान असलेल्या वाळूची वाळू तस्करांनी मोठी लूट सुरू केली आहे. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. हे सर्व समाजासमोर यावे यासाठी तर हा खटाटोप केला नाही ना? अशी चर्चा स्पर्धेपूर्वी सुरू होती. आमदारांसह समाजातील मान्यवरांनी प्रत्यक्ष पळशी, वाकी, वरकुटे, म्हसवड येथील वाळूची लूट पाहून संताप व्यक्त केला.
फोटो ३०म्हसवड-मॅरेथान
म्हसवड (ता. माण) येथे गुरुवारी माणगंगा नदीपात्रातून मॅरेथॉन आयोजित केली होती. यामध्ये आमदार जयकुमार गोरे, शैलेश सूर्यवंशी सहभागी झाले होते. (छाया : सचिन मंगरुळे)
300721\img-20210730-wa0039.jpg
माणगंगा नदीपात्रातून पार पडली नाविन्यपूर्ण मॅरेथॉन
प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून मॅरेथॉन व जनजागृतीपर रॅलीचे आयोजन