सातारा : जी व्यक्ती घटनेच्या मोठ्या पदावर बसली असताना कायदा पायदळी तुडवत आहे, त्या व्यक्तीची लायकी राज्यातील लोकांनी ओळखली आहे. पण मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे तेवढी त्यांची लायकी नाही, असा घणाघात मनोज जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला. यावेळी मी दिसायला बारीक असलो तरी माझ्या टप्प्यात आला की वाजवतोच, असा टोलाही त्यांनी लगावला.सातारा येथील गांधी मैदानावर जाहीर सभेत जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या टिकेचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, माणसाचे वैचारिक मतभेद असावेत, पण आपण कोणत्या पदावर आहोत, त्याची गरीमा राखून त्यांनी बोलावे. त्यांच्याकडे राज्याचे पालकत्व आहे, त्यांनी भान ठेवावे. मी पाचवी शिकल्याचे ते सांगतात. पण सरकारने माझे शिक्षण किती आहे, यावरच तीन दिवस घातलेत, हे लक्षात घ्यावे.जरांगे-पाटील पुढे म्हणाले, लोकांचे खाल्ले की त्यांचा तळतळाट लागतो. आधी तुम्ही मुंबईत काय होता आणि काय विकत होता, तुम्ही कोणच्या पाहुण्याकडे राहून जगलात, हे सर्वांना ठाऊक आहे. तुमच्याकडे काहीही नव्हते आणि एवढी संपत्ती कशातून आली हे सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा कष्टाचा पैसा ओरबाडून खाल्ला म्हणूनच तुम्हाला तुरुंगात जावे लागले, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.भूजबळ यांनी टिका करताना सर्व सीमा पार केल्या. महात्मा फुले, राजर्षि शाहू, यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला एक वेगळा आदर्श दिला. किमान महात्मा फुले यांचा आदर्श त्यांनी स्वत:समोर ठेवून त्यांनी बोलायला हवे होते. जाती-जातीत दंगली घडवण्याची भाषा केली जाते. परंतु, त्यांचे स्वप्न पूर्ण होवू देणार नाही. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांच्यात कोणतीही तेढ निर्माण होवू द्यायची नाही, या राज्यात शांतता राहिली पाहिजे, ही जबाबदारी मराठ्यांनो, तुमच्या खांद्यावर आहे. मराठे आरक्षणात गेले हे लक्षात आल्यानेच जातीय दंगली घडतील, अशी वक्तव्ये करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा डाव असल्याचे जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.
मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे, एवढी त्यांची लायकी नाही, जरांगे-पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर घणाघात
By दीपक देशमुख | Published: November 18, 2023 3:42 PM