सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न झुलवत ठेवले. आज मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यातही राजकारणाचा शिरकाव झाला आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. साताऱ्यात गुरुवारी पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे शरद पवार यांच्या हातात होते. मग त्यांनी ते का नाही केले. २३ मार्च १९९४ च्या अधिसूचनेवर कोणीच का भाष्य करत नाही. मनोज जरांगे-पाटील यांना मी सांगितले होते, आरक्षणाच्या प्रश्नावर आपण विचारमंथन करू. परंतु पुढे काही झाले नाही. त्यांच्या या लढ्यात आता राजकारणाचा शिरकाव झाला आहे. तुम्ही राजकारणच करणार असाल तर ठीक आहे. आम्ही चारसौ पारचा नारा दिला तर विरोधकांनी संविधान बदलण्याबाबत अपप्रचार सुरू केला. वास्तविक संविधानापलिकडे जाऊन कोणाला काहीही करता येत नाही.
कामे केली असती तर ही वेळ आली नसतीपश्चिम महाराष्ट्र हा आमचा बालेकिल्ला आहे, असे शरद पवार सांगत होते. मग पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजना का मार्गी लावल्या नाहीत. त्यांनी कामेच केली नाहीत म्हणूनच त्यांचे पश्चिम महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. कामे केली असती तर ही वेळ आली नसती, अशी मिश्कील टिपण्णीही उदयनराजे यांनी केली.
यशवंत विचारांचा विसर..काँग्रेसला यशवंत विचारांचा विसर पडला असून, जातीय तेढ निर्माण करण्याचे पाप त्यांनी केले आहे. या पक्षाने सत्ता विकेंद्रीकरणाला मूठमाती देऊन घराणेशाही सुरू ठेवली आहे. स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामावर खापर फोडायचे हे बरोबर नाही, असेही यावेळी उदयनराजे म्हणाले.