ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन याच कृष्णा काठावर रेठरे बुद्रूक (ता. कराड ) येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. ते राज्याच्या मंत्रिमंडळात गेल्यावर या कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांचे लहान बंधू जयवंतराव भोसले यांनी सांभाळली. भोसले या कारखान्याचे सलग तीस वर्षे अध्यक्ष राहिले.
अवघा कृष्णाकाठ ''यशवंत हो जयवंत हो'' हे गीत गुणगुणत असताना या बंधू प्रेमाला दृष्ट लागली. अन दोन सख्ख्या भावात सत्तासंघर्ष सुरू झाला. सन १९८९ साली यशवंतराव मोहिते यांच्या रयत पॅनलने जयवंतराव भोसले यांच्या सहकार पॅनलचा पराभव करीत पहिले ऐतिहासिक सत्तांतर केले. हा दोन भावातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यांच्या वारसदारांनीही हा संघर्ष तसाच पुढे कायम ठेवलेला दिसतोय.
पहिल्या सत्तांतरानंतर यशवंतराव मोहिते यांचे पुतणे मदनराव मोहिते यांनी सलग दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर डॉ. पतंगराव कदम व मदनराव मोहिते यांनी गुरुदक्षिणा म्हणून यशवंतराव मोहिते यांचे पुत्र डॉ. इंद्रजित मोहिते यांना कारखान्याचे अध्यक्ष होण्याची संधी प्राप्त करून दिली. या प्रत्येक निवडणुकीत मोहिते भोसले संघर्ष पाहायला मिळाला. पण इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणुकीत सत्ताबदल झाला. भोसले गट सत्तेवर आला. डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष झाले.
दरम्यानच्या काळात सन २००७ च्या सुमारास भारती विद्यापीठाचे प्रमुख डॉ. पतंगराव कदम यांनी मोहिते भोसले ही दोन कुटुंबे एकत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला. कृष्णाकाठाने पहिले ''मनोमिलन'' पाहिले. त्यानंतर २००९-१०साली कारखान्याची निवडणूक लागली. हे मनोमिलन निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा नवख्या असणाऱ्या अविनाश मोहित्यांनी संस्थापक पॅनल रिंगणात उतरविले अन् कोणाच्या ध्यानीमनी नसताना सत्तांतराचा ''नारळ'' फुटला. तेव्हा मोहिते भोसलेंचे हे मनोमिलन सभासदांच्या पचनी पडलेले नाही हे सार्यांनीच अनुभवले. त्यानंतर हे मनोमिलन फारकाळ टिकले नाही ही बाब वेगळीच !
आज कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाची ही चर्चा आहे. विशेष म्हणजे कदम परिवारातीलच सदस्य, विद्यमान सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याबाबत सारख्या बैठका सुरू आहेत. मनोमिलनाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. ''राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो'' हे अगदी खरे आहे. त्यामुळे जर हे मनोमिलन झाले तर नवल वाटायला नको. पण हे नवे मोहिते यांचे मनोमिलन सभासदांच्या किती व कसे पचनी पडेल हे सांगणे अवघडच आहे. तूर्तास या नव्या मनोमिलनासाठी शुभेच्छा द्यायला हरकत नाही.
प्रमोद सुकरे; कराड