मलकापूर : औद्योगिक, शैक्षणिक व दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, केवळ १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असल्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी साखळी पद्धतीचे बंधारे बांधून संपूर्ण राज्यात सिंचन क्षेत्र वाढविण्याचा मानस आहे. हा प्रयोग खटाव, माण तालुक्यांत यशस्वी झाला; पण पावसाने ओढ दिल्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा झालेला नाही. भविष्यात वळवाचा मोठा पाऊस पडला तरीही सर्व बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा होईल. अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मलकापूर येथे प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान वर्षपूर्ती सोहळा, कन्यारत्न योजनेअंतर्गत ठेवपावती वितरण, महिला बचत गटांना भांडवल वाटप, रमाई घरकुलसह सोलर सिटी योजनेअंतर्गत अनुदान वाटपाचा संयुक्त कार्यक्रम मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार भास्करराव शिंदे, आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मदनराव मोहिते, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते, माजी आमदार मदनराव भोसले, रजनी पवार, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., नगराध्यक्षा शारदा खिलारे, नियोजन सभापती शंकरराव चांदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती यमुना घाडगे, मुख्याधिकारी हेमंत निकम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘राज्यात रमाई घरकुल योजनेअंतर्गत काँग्रेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ७० हजार रुपये अनुदान दिले जात होते. त्यामध्ये वाढ करून अनुदान एक लाख रुपये करण्यात आले आहे, तर नगरपंचायत हद्दीतील लाभार्थ्यांना एक लाखाऐवजी दीड लाख तर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना दीडऐवजी दोन लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचपद्धतीने दारिद्र्यरेषेखालील सर्वसाधारण व्यक्तींसाठी राजीव गांधी योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गत तीन वर्षांमध्ये राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, २८ जिल्ह्यात ५५० टँकरद्वारे पाणीपुरवठा तर विविध ठिकाणच्या चारा छावण्यांद्वारे दहा लाख जनावरे जगविण्याचे काम राज्य शासनाने काटेकोरपणे केले आहे. दुष्काळसदृश परिस्थिती व गारपीटसारख्या आपत्तींमध्ये ४२ हजार कोटींची मदत शासनाने दिली आहे. देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत देणारे महाराष्ट्रा व्यतिरिक्त दुसरे कोणतेही राज्य नाही. परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले, ‘शासनाच्या विविध योजना आहेत. त्या सर्व योजनांची अंमलबजावणी मलकापूर शहराने केली असल्याचा प्रत्यय आला. त्यामुळे मलकापूर सर्व सोयींनियुक्त आदर्श गाव निर्माण झाले आहे. लोकसभेत पराभव झाला असला तरी मंत्रिमंडळातील क्रांतिकारी निर्णयाच्या जोरावर विधानसभेत महाराष्ट्रात चांगले यश मिळेल,’ असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी अनंत दीक्षित, आमदार आनंदराव पाटील यांचेही भाषण झाले. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मार्केट यार्ड ते नांदलापूर रस्त्याच्या दुतर्फा, कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर महिला उद्योगपर्यंत दुतर्फा गटार, ढेबेवाडी मार्ग ते पाणीपुरवठा जॅकवेल रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण व झोपडपट्टी संरक्षक भिंत बांधणी अशा विविध कामांसाठी साडेदहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.‘एलबीटी’ऐवजी ‘वॅट’करावर अधिभार :‘मंत्रिमंडळात सध्या धडाडीचे व क्रांतिकारी निर्णय घेतले जात आहेत. जनतेचा शहरीकरणाकडे कल वाढला असून, शहरीकरणाला बळकटी देण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांना करावे लागते. स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता अबाधित ठेवून ‘एलबीटी’ऐवजी ‘वॅट’करावर अधिभार लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आहे,’
अवकाळी पावसातही भरतात माणचे बंधारे
By admin | Published: July 10, 2014 12:25 AM