सातारा : सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही सोमवारी पावसाने हजेरी लावली. वाई, महाबळेश्वरसह दुष्काळी माण, खटाव तालुक्यांतही चांगला पाऊस झाला. खटावमध्ये गारा पडल्या. यामुळे कडाक्याच्या उकाड्यापासून सुटका झाली असली तरी आंबा, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, कांदाबीज पिकांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे.खटाव तालुक्यात दोन-तीन दिवस पावसाचे वातावरण होत होते; परंतु पाऊस पडत नसल्यामुळे हवेत अधिकच उष्णता जाणवत होती. त्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना अखेर पावसाने हजेरी लावल्यामुळे आनंद झाला. पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या मुलांनी या पावसात मनसोक्त भिजून आनंद लुटला. गाराचा पाऊस पडत असल्याने गारा वेचण्यासाठी लहान मुलांसह महिला तसेच आबालवृद्धही गडबड करताना दिसून येत होते.पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. खटाव भागात कांदाबीज, द्राक्ष, आंब्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. या पिकांना गारपिटीचा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे.पुसेगाव : खटाव तालुक्यातील पुसेगावसह काटेवाडी, बुध परिसरात सोमवारी सायंकाळी गारांचा पाऊस झाला. उन्हामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना या पावसाने मोठा दिलासा दिला.दोन दिवसांपासून या भागात कमालीची उष्णता वाढली होती. रविवारी पुसेगावसह परिसरात ढगाळ वातावरण होते; परंतु पाऊस पडला नाही. सोमवारी सायंकाळी अचानक गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गर्मीने हैराण झालेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळला.सध्या या भागातील शेतीची कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी शेतीची नांगरट सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याच्या ऐरणी दराअभावी शेतातच पडून आहेत. अवकाळी पावसाने वीटभट्टी चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.माण तालुक्यातील गोंदवले परिसरातही सायंकाळी अचानक काळे ढग जमा झाले. त्यामुळे अंधारून आले होते. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या पावसामुळे ग्रामस्थांची पळापळ झाली.
माण, खटावमध्ये गारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:07 PM