शिरवळ : कपडे मळलेले, पायाला पैंजणरूपी म्हणून महामार्गावरील रस्त्याकडेला आलेल्या फुलांची माळ बांधलेली अन् भुकेने व्याकूळ झालेला निरागस चेहरा जेव्हा नजरेस पडला, तेव्हा शिरवळवासीयांच्या माणुसकीचे दर्शन घडले. एका एकोणीस-वीस वर्षीय मनोरुग्ण युवतीला खाऊ-पिऊ घालून तिला साताऱ्यातील यशोधन चॅरिटेबल ट्रस्टकडे सोपविण्यात आले.शिरवळ येथे गेल्या दोन दिवसांपासून महामार्गालगत असणाºया शिर्के कॉलनी ते बसस्थानक परिसरात एकोणीस-वीस वर्षीय युवती भटकंती करीत असताना आढळून आली. काही वेळाने संबंधित युवती शिरवळ पोलीस स्टेशनजवळील झाडाजवळ विसावली. दरम्यान, संबंधित युवतीच्या हरकतीमुळे लक्ष वेधलेल्या गणेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी युवतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. भूकेने व्याकूळ झालेल्या त्या युवतीला चव्हाण कुटुंबीयांनी चहा-बिस्कीट खाऊ घातले.संबंधित युवती मनोरुग्ण असल्याचे समोर येताच शिरवळ पोलिसांकडून याबाबतची माहिती सातारा येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवी बोडके यांना देण्यात आली. ही संस्था गेल्या काही वर्षांपासून मनोरुग्ण, निराधार व्यक्तींचा सांभाळ करीत आहे.संस्थेकडून मदतीची तयारी दर्शविल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली अब्दागिरे, चालक कुंभार, शिरवळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी भारती तळपे, पुष्पा धायगुडे, स्वाती खैरमोडे, गीतांजली ननावरे, एफ. पी. निर्मल, सामाजिक कार्यकर्त्या शरयू गावडे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांच्या सहकार्याने सातारा येथील संबंधित युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर संबंधित युवतीला ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आले. संबंधित युवतीबाबत कोणाला काही माहिती असल्यास संबंधितांनी त्वरित संपर्क साधवा, असे आवाहन शिरवळचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व ‘यशोधन’ ट्रस्टचे अध्यक्ष रवी बोडके यांनी केले आहे.मी बीडची पीएसआय..शिरवळ येथे आढळून आलेल्या युवतीकडे पोलिसांसह वैद्यकीय अधिकाºयांनी चौकशी केली. यावेळी कधी हसत तर कधी चिंताग्रस्त होत ‘मी बीडची पीएसआय असून, मी चौकशीकरिता येथे आले आहे.’ असे सांगत ती हास्याचे फवारे उडवित होती. त्यामुळे संबंधित युवती ही शिरवळमध्ये कशी आली? याबाबत उलगडा होऊ शकला नाही.
मनोरुग्ण युवतीसाठी धावली शिरवळवासीयांची माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 10:43 PM