अंगापूर : अंगापूर तर्फ तारगाव या गावाने आपल्या एकीचे दर्शन घडवीत कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता गावशिवारातील तब्बल नऊ किलोमीटरचे रस्ते मुरमीकरण व मजबूतीकरण करत स्वखर्चाने तयार केले. अनेक पिढ्यांपासून असलेली शेतीची व स्वत:ची फरपट इतिहासजमा केली.मुळातच बागायती, काळवट व सुपीक जमीन पावसामुळे चिखलमय होत असे. चालत जाणेही अशक्य असताना वाहने कशी जाणार? त्यामुळे गेली कित्येक वर्षे या परिसरातील शेतमाल शेतकऱ्यांच्या घरी पोहोचताना नाकीनऊ होत होते. पावसाळ्यात कित्येक वेळा पिके तिथेच कुजून नष्ट होत होती. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी सहन करत होते.
ऊसकाढणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर तर ग्रामस्थांना अग्निदिव्यच करावे लागत होते. रस्ता नीट नसल्यामुळे सडणारे पीक व होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा पर्याय ग्रामस्थांकडे नव्हता.लॉकडाऊन त्यातच उन्हाळ्यात शेतीची कामे कमी असल्याने गावातील लोकांना कामे कमी प्रमाणात होती. उरलेल्या वेळेत काहीतरी शाश्वत काम करावे जेणेकरून गावाचा एखादा प्रश्न कायमचा मिटला जाईल, या विचाराने अंगापूर तर्फ ग्रामस्थांची आमदार महेश शिंदे यांच्या समवेत एक बैठक झाली. त्यात पाणंद व शेतशिवार रस्ते दुरुस्तीचा विषय घेण्यात आला. सुरुवातीला गावातील काही जणांनी वेगवेगळ्या अडचणी मांडत यास विरोध केला. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा सोडविण्याचा जणू चंगच बांधला.मुळातच शेतीप्रिय व त्यातून आर्थिक सुबत्ता प्राप्त झालेल्या या गावाने क्षणाचाही विलंब न लावता या कामास हात घातला. रस्त्यांच्या आजूबाजूला व दुतर्फा शेती असणाऱ्या प्रत्येकाकडून प्रतिगुंठा पन्नास रुपयांप्रमाणे रक्कम आकारण्याचे ठरविल्याने रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. हे काम मोठे असल्याने यंत्रसामग्री आवश्यक होती.
यासाठी आमदार शिंदे यांनी पोकलँड मशीन स्वखर्चाने देत मोठा अडथळा दूर केला. त्यामुळे तर गावकऱ्यांनी हाती घेतलेल्या कामाला मोठे बळच मिळाले. गावातील जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर वाहने वापरायला दिली. तब्बल एक महिनाभर चाललेल्या या कामाने अनेक वर्षांची फरपट थांबविली. दोन पाणंद तर दोन कालव्यावरील रस्ते तयार करून मुख्य रस्त्यांना जोडले.रस्त्याचा लेखाजोखा..
- लोकसहभाग रकमेतून-सात लाख
- सहभागी वाहनांसाठी डिझेल- दररोज खर्च २५ ते ३० हजार
- यंत्रणा- १ पोकलँन्ड,१ जेसीबी, ३ डंपर,२० ट्रॅक्टर
- कालावधी -२३ दिवस
- पाणंद रस्त्यामुळे होणार फायदा
- वाहनांचे बारमाही दळणवळण होण्यामुळे शेतीत तरुणांचा सहभाग वाढणार
- ऊसतोड वेळेत झाल्यास खर्च वाचणार
- पावसाळ्यातही सोयाबीन, तरकारी पिके घेता येणार
- शेतीची मशागत, वरखते, जनावरांचा चारा ने-आण करण्यास सोईस्कर होणार
- शेळीपालन, कुक्कुटपालन, गाई, म्हशी पालन या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणार
- गावच्या आर्थिक सुबत्तावाढीस चालना मिळणार
गेली अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी खस्ता खाल्ल्या. नुकसान सहन केले. आता मात्र गावकऱ्यांच्या सहभागातून तयार झालेल्या या रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीच्या मरणयातना संपून शेतीच्या नव्या आशा निर्माण झाल्या.- जयवंत शेडगे,ज्येष्ठ नागरिक, अंगापूर तर्फ तारगाव