फलटण : भारतीय जनता पक्षात यापुढेही जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. दरम्यान, भाजपा शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच कामकाज करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.भारतीय जनता पक्षात माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम, जिल्हा परिषद शेती समिती सभापती शिवाजीराव शिंदे, मनोज घोरपडे व अन्य पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश झाल्याची घोषणा आणि कार्यकर्ता मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षपदावरून प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, खा. संजय काकडे, माजी आमदार पाशा पटेल, दिलीप येळगावकर, कांताबाई नलवडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते. दानवे म्हणाले, ‘आगामी काळात पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ज्या-त्या भागात अडवून जमिनीखालील पाणी पातळी उंचावण्याचा व त्याद्वारे शेतीला अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून प्राधान्याने केला जाणार आहे. आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्याची पहिली पायरी म्हणून दीनदयाळ उपाध्याय आणि पंजाबराव देशमुख योजनेद्वारे आर्थिक सवलती जाहीर केल्या आहेत.सत्ता बदलानंतर किंंबहुना बदलेल्या सरकारने घेतलेला विकासाचा वेग आणि सर्वसामान्यांना होणारे लाभ लक्षात घेऊन भाजपामध्ये अनेक मोठमोठी माणसे प्रवेश करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री कदम, शिवाजीराव शिंंदे यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व असल्याचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी स्पष्ट केले.’महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भाजपामुळे सामान्य माणसांचे भले होणार आहे. हा लोकांच्यात विश्वास निर्माण झाल्याने या पक्षाबद्दल सर्वच ठिकाणी आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ होत आहे. जलयुक्त शिवारद्वारे ५ हजार गावांना फायदा झाला आहे. शेतीमालाला अधिक दर देण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी सुखी समाधानी राहील यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. दिवंगत चिमणराव कदम यांनी या तालुक्यात जनसामान्यांसाठी चांगले काम केले त्यांचा वारसा चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सह्याद्री कदम यांच्या माध्यमातून सक्षम पर्याय उभा राहू शकतो याचा विचार करून त्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला असून, आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून त्यांना पूर्ण ताकद देऊन विकासाच्या कामात अग्रेसर राहण्याची संधी दिली जाणार आहे. भविष्यात भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन कामाची संधी द्या. पंतप्रधानांचे हात बळकट करा सर्वांचे हित निश्चित होईल.’ अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सह्याद्री कदम यांच्या प्रवेशाने भाजपात नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या पाठीशी राहा.श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने दिवंगत चिमणराव कदम यांनी फलटण तालुक्यात आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक विकासाला चालना दिली परंतु अलीाकडे शहरात नागरी सुविधा योग्यप्रकारे मिळत नाहीत, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे नमूद करीत जिल्हा परिषदेच्या सर्व सात गटांचा आढावा घेत तेथेही अनेक समस्या असल्याचे निदर्शनास आणून दिले.कार्यक्रमास भाजपा राज्य चिटणीस अतुल भोसले, रवी अनासपुरे, अॅड. भरत पाटील, लोणंदचे उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, शिवाजीराव शिंदे, विक्रम पावसकर, महेश शिंदे, मनोज घोरपडे उपस्थित होते. अशोक भोसले यांनी प्रास्ताविक केले. विजय कढणे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
यापुढेही अनेक दिग्गज नेते भाजपात येणार : दानवे
By admin | Published: October 22, 2016 11:54 PM