बामणोली : यावर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहिलेला पाऊस व जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेले पशुधन यामुळे बहुतेक डोंगररांगा गवतचाऱ्याने भरलेल्याच आहेत. गाई, म्हैशी असलेल्यांनी गवताच्या गंजी लावून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांची चिंता मिटली आहे. कोणाला आवश्यकता असेल तर स्वत: कापून नेण्याचे आवाहन केले आहे.पाटण तालुक्यातील कोयनानगर, नवजापासून ते वासोटा महाबळेश्वर, वाई, मांढरदेवीच्या डोंगरांपर्यंत तसेच साताऱ्याच्या बोगद्यापासून कास, बामणोली तापोळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात गवत शिल्लकच आहे. चारा कापून दुसरीकडे पाठविला तर लाखो ट्रक चारा गोळा होईल. मात्र वणवा लागला तर वणव्याबरोबर हजारो झाडेझुडपे व सुक्ष्म जीव, जंगली पशूपक्षी यांची जीवीतहानी होईल.
याची भीती ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सतावत आहे. अनेकांची गवताची कुरणे व रान, डोंगर घरांच्या शेजारीच आहेत. त्यामुळे डोंगराबरोबर घराजवळील व रस्त्याकडील झाडाझुडूपांनाही धोका पोहोचणार आहे. त्यामुळे गरजू लोकांना आपल्या डोंगरातील गवत चारा येऊन मोफत कापून घेऊन जाण्याचे आवाहन अनेक शेतकरी करत आहेत.