सातारा : राज्यातील दिग्गजांनी नेतृत्व केलेल्या माढालोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच अनेकांनी दंड थोपटले असून राजकीय घडामोडीही वाढल्या आहेत. त्यामुळे विरोधकही एकत्र येताना दिसून येत आहेत. या कारणाने माढ्यात बेरीज-वजाबाकी मोठ्या प्रमाणात होणार असून भाजपसाठीतरी सध्यस्थितीत निवडणूक अवघड बनू पाहत आहे.राज्यातील साताऱ्यापेक्षा लोकसभेचा माढा मतदारसंघ पहिल्यापासून चर्चेत आला आहे. २००९ पासून अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पहिल्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर दुसऱ्यांदा २०१४ ला राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नेतृत्व केले. तिसऱ्यावेळी मात्र, राष्ट्रवादीचा पराभव करत भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार झाले. त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळेच भाजपला विजयाचे तोंड पाहता आले.पण, आता मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीत असतानाही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरु पाहत आहे. मागीलवेळी विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंहसाठी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे भाजपला मताधिक्य मिळाले. आज मोहिते-पाटील यांचे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी सलगी असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यातच रामराजे आणि खासदार रणजितसिंह यांचे वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे महायुतीत असूनही रामराजे यांचा रणजितसिंह यांना विरोधच राहणार आहे. अशातच रामराजेंनी मोहिते-पाटील यांच्याशी जवळीक साधल्याने निवडणुकीवेळी प्रत्यक्षात काय होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे.विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील हे भाजपमध्ये कार्यरत असलेतरी त्यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे विद्यमान खासदारांना शहच बसू लागला आहे. अशातच भाजपने उमेदवारी डावलल्यास धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडेही जाऊ शकतात. अशावेळी मोहिते-पाटील यांच्याबरोबरच रामराजेही खासदार रणजितसिंह यांना पराभूत करण्यासाठी धैर्यशील यांना मदत करु शकतात. अशी संकटे भाजपपुढे उभी राहू लागली आहेत. त्यातच आता महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनीही माढ्यातून शड्डू ठोकला आहे.
माजी मंत्री जानकर यांनी चार दिवसांपूर्वीच फलटणमध्ये मोठी सभा घेऊन माढा लढविण्याचा इरादा जाहीर केला आहे. यामुळे भाजप तसेच खासदार रणजितसिंह यांच्यासाठी हा मोठा धक्का राहणार आहे. जानकर यांचा लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्र की खरेच निवडणूक लढविणार हे समजण्यासाठी काही अवकाश आहे. तरीही जानकर स्वत: उभे राहिल्यास खूप मोठा राजकीय बदल होऊ शकतो. कारण, २००९ च्या निवडणुकीत त्यांनी एक लाख मते मिळवली होती. आज रासपची ताकद वाढली आहे. त्यामुळे जानकर हे माढ्याबरोबरच इतर मतदारसंघातही भाजपला डोकेदुखी ठरु शकतात. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून अभयसिंह जगताप यांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम घेऊन ते स्वत:ला चर्चेत ठेवत आहेत. यामुळे माढ्यात अनेकजणांनी निवडणुकीसाठी दंड थोपटल्याचे दिसून आले आहे.माढ्यासाठी वज्रमूठ की नुसती राजकीय चर्चा..माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे इच्छुक पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. अशाच एका कार्यक्रमात रासपचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर, शरद पवार गटाकडून इच्छूक असलेले अभयसिंह जगताप, भाजपकडून तयारी करणारे धैर्यशील मोहिते-पाटील, माण विधानसभेसाठी पुन्हा शरद पवार गटाकडून तयारी केलेले प्रभाकर देशमुख आणि भाजपचे व सातारा जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई हे एकत्र आले होते. यावेळी एकमेकाच्या विरोधात असूनही त्यांनी वज्रमूठ बांधली. पण, बदलत्या राजकारणात वज्रमूठ घट्ट होणार की फक्त राजकीय चर्चा राहणार हे लवकरच समोर येणार आहे.
मोहिते-पाटील यांना जानकर मदतीची साद घालणार ?मुंबईत मंत्रालयात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राम सातपुते, दीपक चव्हाण, रणजितसिंह माेहिते-पाटील आणि धैर्यशील माेहिते-पाटील एकत्र होते. यामधील जानकर आणि धैर्यशील मोहिते हे माढ्यातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. यावेळी जानकर यांनी मोहिते-पाटील यांच्याशी एकदमच जवळीक साधल्याचे दिसून आले. ही जवळीक माढ्यात मदत व्हावी यासाठीतर नव्हती ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.