दत्ता यादव ।सातारा : जनतेच्या सेवेचे आणि सुरक्षिततेचे वृत स्वीकारलेल्या अनेक पोलिसांना तब्बल दहा-दहा वर्षे आपल्या कुटुंबासोबत थर्टी फर्स्ट साजरा करता आला नसल्याचे समोर आले आहे. जनतेच्या आनंदातच आमचा आनंद असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या.
पोलिसांना तसं पाहिलं तर चोवीस तास ड्यूटी करावी लागते. दिवाळी, दसरा, गणपती, ईद अशा प्रकारच्या कोणत्याच उत्सवाला पोलिसांना आपल्या घरी जाता येत नाही. यातून थर्टी फर्स्टही सुटलं नाही. नववर्ष साजरं करण्यासाठी अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत विकेंड साजरा करण्यासाठी चार-पाच दिवसांची सुटी घेऊन लाँग ड्राईव्हला जातात. या लोकांना चांगला ऐंजॉय करता यावा आणि त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी मग पोलिसांना सतर्क राहावे लागते. अनेकांच्या सुट्या रद्दही केल्या जातात. असे असले तरी काही पोलीस कर्मचारी वेळात वेळ काढून घर जवळ असेल तर आपल्या कुटुंबासोबत नववर्ष साजरा करण्यासाठी जातात; परंतु अनेकजण असे आहेत. दहा-दहा वर्षे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत घरी गेले नाहीत, अशा काही निवडक लोकांना ‘लोकमत’ने बोलतं केलं. सातारा शहर पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेल्या गोपनीय विभागातील एक कर्मचारी तब्बल दहा वर्षे झाले कुटुंबासोबत थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गेला नाही.
दरवर्षी थर्टी फर्स्टला हामखास ड्यूटी असतेच, असे त्या कर्मचाºयाने सांगितले.हजेरी मेजर, लॉक आॅफ बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाºयांचीही हीच स्थिती आहे. या पोलीस कर्मचाºयांनाही दहा वर्षे घरी जाता आलं नाही. घरी जाता न येणं यात कोणाचा दोष नाही. मात्र, आमच्या ड्यूटीचे कर्तव्य आम्हाला पार पाडावे लागते. आम्हीच नववर्ष साजरा करण्यासाठी सुटी घेतली तर जनतेच्या सुरक्षिततेची काळजी कोण घेणार, असं एका महिला पोलिसाचं म्हणणं होतं. आम्ही दहा वर्षे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी घरी गेलो नाही, ही आमची तक्रार नाही. ऐंजॉय करण्यासाठी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असं बºयाच पोलिसांचं मत होतं.
वडील आजारी होते...थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी किती पोलीस घरी गेले नव्हते, याचा कानोसा घेतला असता पंधरांहून अधिक कर्मचारी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गेले नसल्याचे समोर आले. त्यापैकी एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलेली कहाणी ऐकून अक्षरश: अंगावर काटा आला. रात्री एकच्या सुमारास ड्यूटीवर असताना वडील आजारी असल्याचा फोन आला. मात्र, त्याचवेळी आम्हाला दरोडेखोरांची गाडी येत असल्याची टीप मिळाली होती. त्यामुळे मी कोणालाही सांगितले नाही. रात्रभर आम्ही दरोडेखोरांचा शोध घेतला. त्यावेळी दोघेजण सापडले. आमची मोहीम फत्ते झाल्यानंतरच मी सकाळी घरी गेलो. वडील आजारी असले तरी कर्तव्य महत्त्वाचे होते.