लोकमत न्यूज नेटवर्क
किडगाव : कण्हेर, ता.सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने आत्तापर्यंत आदर्शवत काम केले आहे. अनेक पदे रिक्त असतानाही रुग्णांना चांगली सेवा देण्यात येत आहे. मात्र, सध्या कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष देऊन पुरेसे कर्मचारी दिले, तर लसीकरण मोहीम आणखी वेग घेऊ शकते.
कोरोना कालावधीमध्ये कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि सेवक वर्गाने अविरतपणे रुग्णांची सेवा केली. मात्र, सेवक कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. कारण लसीकरणाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करून रजिस्ट्रेशन करणे, त्यांना लसीकरण डोस देणे ही कामे करावी लागतात. त्यातच कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत कामथी, धावडशी, वर्ये, वेण्णनगर, कोंडवे ही उपकेंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. आरोग्यसेविकांची संख्या चार आहे, तर आरोग्य सहायक एकूण पदे चार असून, त्यामधील दोन पदे गेले रिक्तच आहेत. शिपाई पदांच्या जागा चार असून, त्यामधील एक जागा अद्यापही रिकामीच आहे.
कोंडवे आणि धावडशी या उपकेंद्रातील आरोग्य सेवक पद हे रिकामे असल्याने सेवा देताना अडचणी येत आहेत. २१ हजार लोकसंख्येचा भार संभाळणाऱ्या वर्ये उपकेंद्रातील आरोग्य सेविकेचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे, तर कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविकेची पदेही भरलेली नाहीत. कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लार्क पद रिकामे असल्याने लसीकरणाच्या वेळेला मोठी अडचण येत आहे. उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवक अथवा सेविकेच्या मार्फत हे ऑनलाइनचे काम सध्या पार पाडले जात आहे.
सातारा शहराची हद्दवाढ झाली, त्यावेळी शाहुपुरी आणि दरे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कामे ही सातारा नगरपालिकेने करायला हवी होती. तसा पत्रव्यवहारही झाला. मात्र, नगरपालिकेने आपणाकडे आरोग्य कर्मचारी कमी असल्याने या विभागातील आरोग्याचे काम कण्हेर आरोग्य केंद्राने पाहावा, असा पत्रव्यवहार केल्याने ४० हजार लोकसंख्येची कामे प्राथमिक आरोग्य केंद्राला करावी लागत आहेत. यामुळे नगरपालिका क्षेत्रातील अतिरिक्त कामाचा ताण या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आलेला आहे.
कोरोनामुळे आरोग्य अधिकाऱ्यांबरोबरच येथील सर्व सेवक वर्गाने प्रामाणिकपणे रुग्णांच्या घरी जाऊन सेवा केली. आत्ताही ते करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लसीकरणाची जोरदार मोहीम राबविली जात आहे. प्रत्येक उपकेंद्रात वेगवेगळ्या दिवशी उपलब्ध असलेल्या स्टाफचा वापर करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत लसीकरण कसे पोहोचविले जाईल हे पाहिले जात आहे, तरीही अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ताण येत आहे.
चाैकट :
सातारा पालिकेने जबाबदारी घ्यावी...
सद्यपरिस्थितीत सेवक वर्गाला अनेक कामे करावी लागतात. त्यामुळे शासनस्तरावर आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरून या ठिकाणच्या सेवक वर्गावर असलेला अतिरिक्त ताण कमी करावा, तसेच सातारा नगरपालिकेच्या हद्दीतील शाहुपुरी आणि दरे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील आरोग्याची सर्व जबाबदारी नगरपालिकेने उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.