ढेबेवाडी : मुसळधार पावसासह पुराच्या पाण्यामुळे आठ दिवसांपासून विस्कळीत झालेले ढेबेवाडी विभागातील जनजीवन पूर्ववत करण्यात अद्यापही प्रशासनाला यश आलेले नाही. गावांना जोडणारे ओढ्या-नदींवरील पूलच वाहून गेल्याने अनेक गावे आणि वाड्यावस्त्या संपर्कहीन झाल्या आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींना जलसमाधी मिळाल्याने पावसाळ्यातही विभागातील अनेक गावांची तहान टँकरनेच भागवावी लागत आहे. गावागावात टॅंकर आला की झुंबड उडत आहे तर काही गावांमध्ये रस्त्याअभावी टँकरच पोहोचू शकत नसल्याने पाण्याची मोठी टंचाई भासत आहे.
विभागातील वांग नदीकाठी असलेली पंचवीस गावे आणि वाड्या-वस्त्यांच्या पाणी योजना नदीच्या प्रवाहाशेजारीच आहेत. या योजना करताना संभाव्य पूरस्थितीचा अंदाज घेऊनच पाणी पुरवठा विभागाकडून त्याचे नियोजन केले जाते. मात्र, यावेळच्या पावसाने सर्वांचे अंदाज चुकवत काही अपवाद वगळता नदीकाठच्या विहिरींना पुराच्या पाण्यामुळे जलसमाधी मिळाली तर काही विहिरीच वाहून गेल्या आहेत. काही गावांच्या जलवाहिन्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, मोटारघरेही वाहून गेली आहेत. उर्वरित गावांच्या विहिरींमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्या मोठ्या प्रमाणात गाळाने भरल्या आहेत.
विभागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी वांग नदीपात्रात पाण्याचा मोठा प्रवाह आहे. यामुळे विहिरींची आणि मोटारघरांची दुरुस्ती करण्यात अडचणी येत आहेत. काही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचीच मोठी दुरवस्था झाल्याने तेथे पोहोचणे अवघड झाले आहे. पाणी योजनांची कामे करणेही शक्य होत नाही. यामुळे विभागातील गुढे, तळमावले, करपेवाडी, साईकडे, पाचुपतेवाडी, मंद्रुळकोळे, ढेबेवाडी, भोसगाव, मालदन, जानुगडेवाडी, बनपुरी, बाचोली आदी गावचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्याकडून विभागात मागेल त्या गावात टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने काही गावांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात तात्पुरता सुटला आहे.