ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील आदर्श ग्राम मान्याचीवाडीची कन्या वैशाली उत्तमराव माने - जाधव यांची अमरावती येथे पोलीस उपायुक्त या पदावर पदोन्नती झाली आहे. याबाबचा आदेश राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव यांनी नुकताच जारी केला आहे.
कोल्हापूर येथून पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलिसात दाखल झालेल्या वैशाली माने यांनी त्याठिकाणी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच सडकसख्याहरींवर मोठा वचक ठेवला होता. त्यामुळेच त्यांची लेडी सिंघम म्हणून पोलीस दलात ओळख आहे. कोल्हापूरनंतर पुणे येथे त्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकात अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर काम करत असताना, अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना यश आले. नुकतीच त्यांची अमरावती येथे पोलीस उपायुक्तपदी पदोन्नती करण्यात आल्याचा आदेश राज्याच्या गृहविभागाने जाहीर केला.
वैशाली माने या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावच्या असून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्राचार्य उत्तमराव माने यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या पदोन्नतीमुळे आदर्श गावाच्या लौकिकात आखणीनच भर पडल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.