सागर गुजर ल्ल सातारा शॉपिंग सेंटर उभे करण्यासाठी पालिकेला मोठा निधी खर्च करावा लागत असतो. यावर उपाययोजना करत पालिकेने उस्मानाबाद नगरपालिकेच्या धर्तीवर केवळ इमारत आराखड्यावर शॉपिंग सेंटरचे लिलाव करण्यास परवानगी देण्याची मागणी द्यावी, असा ठराव सातारा पालिकेने नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना दिला आहे. पालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करून उपाययोजना राबविण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत. इमारत उभी करण्याआधी या इमारतीच्या प्लॅननुसार त्याचे लिलाव करायचे आणि या लिलावाच्या बोलीतून मिळालेल्या अनामत रकमेतून इमारत उभी करायची. या संकल्पनेमुळे पालिकेला शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी मोठा निधी उभा करण्याची गरज पडणार नाही. तसेच शासनाकडून विविध योजनांतून आलेला निधी इतर प्रमुख विकासकामांसाठी वापरता येऊ शकेल. या व्यतिरिक्त इमारत बांधून झाल्यानंतर त्यातून भाड्याच्या रूपाने पालिकेला आर्थिक लाभही होणार आहे. यानुसार सातारा नगरपालिकेने सि.स.नं. ४१७ सदर बझार, सि.स.नं. १६६ रविवार पेठ, सि.स.नं. ७५ मल्हार पेठ शॉपिंग सेंटरवरील मजला, सि.स.नं.३६८ शनिवार पेठ, लो कॉस्ट शॉपिंग सेंटर, सदर बझार या ठिकाणी अशा प्रयोगाद्वारे शॉपिंग सेंटर उभी करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. सन २००९ मध्ये उस्मानाबाद नगरपालिकेने असा प्रयोग राबवून तो यशस्वीही केला होता. त्याच धर्तीवर असा प्रयोग साताऱ्यातही करता येणे शक्य आहे. शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी शासनाची वैशिष्ट्यपूर्ण योजना व युडीएसएमटीचा निधी वापरला जातो. शहरात या निधीतून अनेक शॉपिंग सेंटर्स उभे राहिले आहेत. बांधकामानंतर त्यांचा लिलाव होतो. त्यानंतर पालिकेला उत्पन्न सुरू होते. मात्र, इमारतीच्या प्लॅनवर अनामत रक्कम भरून घेतल्यामुळे शासनाकडून मिळणारा निधी इतर चांगल्या कामांसाठी वापरता येणार असून, जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
नकाशा दाखवून विकणार गाळे !
By admin | Published: July 10, 2014 12:34 AM