सातारा : साताऱ्यात काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चाच्या तयारीबाबत जय्यत तयारी करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणजे दि. ११ रोजी सातारा शहरातील स्वराज्य मंगल कार्यालयात नियोजन बैठक होत आहे. या बैठकीत मराठा समाज बांधवांचा हुंकार घुमणार असून, मोर्चाच्या तयारीसाठी तब्बल १४ विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक गण आणि गावांतही बैठक होणार आहे.अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेनंतर राज्यात मराठा समाज बांधवांचे मोर्चे निघू लागले आहेत. उस्मानाबाद, बीड आदी ठिकाणी तर लाखोंच्या संख्येने हे मोर्चे निघाले. आता सातारा जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे.फलटण येथे तर स्वतंत्र मोर्चा काढण्यात येणार असून, तसे नियोजन करण्यात आले आहे. साताऱ्यातही मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासाठी रविवार, दि. ११ रोजी दुपारी एकला साताऱ्यातील स्वराज्य मंगल कार्यालयात जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वांनी या बैठकीत सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे. साताऱ्यातील महामोर्चाचे नियोजन सुरू असलेतरी या मोर्चासाठी १४ समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. सातारा शहराबरोबरच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी ही समिती कार्यरत असणार आहे. यामध्ये प्रचार व प्रसार साहित्य समिती, स्वयंसेवक समिती, जनसंपर्क समिती, मीडिया समिती, अर्थ समिती, प्रशासन समिती, स्वच्छता समिती, व्हिडीओ आणि फोटो समिती, महिला व्यवस्था समिती, स्टेज मॅनेजमेंट समिती, भोजन व्यवस्था समिती, पार्किंग समिती, ब्रॉडकास्ट व साऊंड समिती आणि वैद्यकीय सुविधा समिती यांचा समावेश असणार आहे. स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांना विविध कामे नेमून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रचार व प्रसार समितीकडे फ्लेक्स, पत्रके, झेंडे आदींचे काम असणार आहे. अर्थ समितीकडे मोर्चाचा आर्थिक व्यवहार आणि जमा खर्च पाहणे, प्रशासन समितीकडे पोलिस आणि जिल्हा प्रशासन तसेच संबंधित सर्व यंत्रणेशी संपर्क व समन्वय ठेवणे, असे काम असणार आहे. स्वच्छता समितीकडे पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक व इतर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे, असे काम राहणार आहे. (प्रतिनिधी) तीन लाखांपेक्षा अधिक महिलांचा सहभाग!साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चा हा महामोर्चा ठरेल त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात येत आहे. तसेच या मोर्चात मराठा समाजातील किमान तीन लाखांपेक्षा अधिक महिला सहभागी होतील, असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी महिला व्यवस्था समिती कार्यरत राहणार आहे. स्टेज मॅनेजमेंट समितीकडे स्टेजवर कोणी नेता नसेल, पाच मराठा समाजातील मुली निवेदन वाचतील अशाप्रकारचे नियोजन असणार आहे. या मोर्चापासून दोन किलोमीटर परिसरात व शहरात वाहने येणार नाहीत याबाबतचे नियोजन करण्यासाठी पार्किंग समिती कार्यरत असणार आहे.
मराठा बांधवांचा आज घुमणार हुंकार!
By admin | Published: September 11, 2016 12:07 AM